लाल कांद्याचं लासलगाव बाजार समितीत आगमन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक क्षेत्रात परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात लाल कांद्याला फटका बसलेला आहे त्यामुळे लाल कांदा बाजार समितीत येण्यास उशीर असतांना धुळे जिल्ह्यातून लाल कांद्याचे आगमन नाशिक जिल्ह्यात झाले आहे. लासलगाव बाजार समितीत २० वाहनांची आवक होऊन लाल कांद्याला ४२०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे.

दरवर्षी साधारणपणे दसऱ्याच्या आसपास लाल कांदा बाजारपेठेत येत असतो यंदा अधिक महिना आल्याने दसरा उशिरा येतोय . लाल कांदा परतीच्या पावसाच्या कचाट्यात अडकल्याने सुमारे महिनाभर उशिराने हा कांदा बाजारपेठेत दाखल होऊ लागला आहे.

परतीच्या पावसाने उन्हाळ कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने देशात मागणी व पुरवठा या मध्ये असमतोल निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याच्या दर हे वाढलेले आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा १० हजार रुपयांच्या घरात गेलेला आहे.उन्हाळ कांदा ४ हजाराचा टप्पा ओलांडत असताना केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू केली त्यानंतरही भाव वाढत राहिले अशा परिस्थितीत व्यापारी वर्गावर प्राप्तीकर विभागाचे छापे ही पडले तरीही कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना नाशिक जिल्ह्यातील लागवड करण्यात आलेला लाल कांदा पावसाच्या तडाख्यात सापडलेला असल्याने यंदा जिल्ह्यातील लाल कांद्याचे आगमन लांबणीवर पडणार आहे अशा स्थितीत धुळे जिल्ह्यातील कांद्याचे नाशिक नगरीत आगमन झालेले आहे.

लाल कांदा यंदा चार ते पाच वेळा लागवड करूनही परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडलेला असल्याने जिल्ह्यातील प्रमुख लागवड होत असलेल्या चांदवड, मालेगाव,देवळा या तालुक्यातील लाल कांदा अजून महिनाभर तरी बाजारपेठेत दाखल होणार नसल्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. दसऱ्याच्या आसपास चांदवड व देवळा तालुक्यातील तसेच मालेगाव तालुक्यातील लाल कांद्याचे आगमन होत असते नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक दरवर्षी होते.

उन्हाळ कांद्याच्या दरात वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करत निर्यात बंदी लागू केलेली आहे आता लाल कांद्याचे आगमन होत असताना या लाल कांद्याला देखील उन्हाळ कांदा प्रमाणेच निर्यातीला फटका बसणार आहे.नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत चांगल्या प्रमाणात आखाती देशांमध्ये लाल कांद्याची निर्यात होत असते त्यामुळे लाल कांद्याला देखील निर्यात बंदीचा फटका यंदा बसण्याची शक्यता आहे.देशाला यामुळे परकीय चलनाला मुकावे लागणार आहे.

दरवर्षी खानदेशातील धुळे, नंदुरबार ,साक्री या भागातून लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तो कांदा सर्वात आधी बाजारपेठेत दाखल होत असतो नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, चांदवड, देवळा या भागातील कांदा त्यानंतर दाखल होतो यंदा जिल्ह्यात परतीच्या पावसाने लाल कांदा नुकसानग्रस्त झाल्याने जिल्ह्यातील लाल कांदा बाजारात दाखल होण्यास अवकाश आहे अशा परिस्थितीत खानदेशातील कांदा जिल्ह्यात दाखल झाल्याने उन्हाळ कांद्याचे वाढलेले दर स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्यावर्षीही परतीच्या पावसाचा बसला होता लाल कांद्याला तडाका…

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने लाल कांद्याला जबरदस्त फटका बसला होता त्यामुळे लाल कांदा मागील वर्षी नोव्हेंबर मध्ये बाजारपेठेत दाखल झाला होता यंदाही काहीशी तशीच परिस्थिती लाल कांद्याच्या बाबतीत असून लाल कांदा नोव्हेंबर मध्ये मोठ्या प्रमाणात बाजार समित्यांमध्ये विक्रीस येण्याची शक्यता आहे.

गतवर्षी ११ हजार रुपये पर्यंत मिळाला होता लाल कांद्याला भाव.

लाल कांद्याचे अत्यंत कमी प्रमाणात आगमन लासलगाव बाजार समितीत झाले आहे . लाल कांद्याला ४२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला मात्र मागील वर्षी देखील लाल कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात तेजीत होते

निर्यात बंदीच्या चक्रव्यूहात अडकणार लाल कांदा..

उन्हाळ कांद्याचे दर वाढू लागताच केंद्र सरकारने निर्यात बंदी जाहीर केली व बाजार भाव वाढ कमी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर प्राप्तिकर विभागाची व्यापारी वर्गावर छापेमारी झाली तसेच इतर देशातून कांदा आयात करण्यासाठी अनेक सवलतीही सरकारने दिल्या,कांदा साठवणूकवर निर्बंध लावून कांदा भाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले.त्यातच आता लाल कांदा बाजार समित्यांमध्ये दाखल होऊ लागला आहे लाल कांदा देखील मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो मात्र निर्यात बंदी जाहीर केलेली असल्याने या निर्यात बंदीच्या चक्रव्यूहात लाल कांदा सापडणार आहे हे निश्चित…

गेल्या वर्षी लाल कांद्याला असे मिळाले भाव…

महिना (२०१९) बाजार भाव
नोव्हेंबर ११००-७१११-४४००
डिसेंबर ११००-१११११-६३९७
जानेवारी १०००-५०७५-३५१०
फेब्रुवारी ७००-२८६१-२२८०
मार्च ४००-१९९९-१५२०

You might also like