Art of Living च्या प्रकल्पामुळे 18 जिल्ह्यात जलक्रांती, 32 नद्या होताहेत पुनर्जीवित; कृषी क्षेत्राला मोठा लाभ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या काही वर्षापासून राज्यात सुरु असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नदी पुनर्जीवन प्रकल्पाला चांगले यश येत असून यामुळे मोठी जलक्रांती होत आहे. नद्यांची क्षेत्रे पुनर्जीवित होऊन भूजल पातळीत वाढ होत असल्याने जलसंधारण व शेती क्षेत्राला मोठा लाभ होत आहे. या प्रकल्पात राज्यातील एकूण 18 जिल्हे समाविष्ट असून आतापर्यंत एकूण 32 नद्यांच्या खोऱ्यांमध्ये पुनर्जीवनाचे काम करण्यात येत आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून नद्यांचा अभ्यास, भौगोलिक स्थिती, नदी पात्रातील भूशास्त्रीय रचना समजून घेत या नद्या पुनर्जीवित व्हाव्यात यासाठी तांत्रिक आराखडा करत प्रकल्पाचे टप्पे निश्‍चित केले आहेत. अनेक कारणांनी खंडित झालेले प्रवाह पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साठवणे व खोलपर्यंत झिरपण्याची प्रक्रिया पूर्ण करत भूजल पातळीत वाढ होत आहे. तसेच भूशास्त्रीय अभ्यासाच्या आधारे बांध, बंधारे अशा कृत्रिम रचनाही केल्या आहेत. जलक्रांतीचे परिणाम दिर्घकाळ राहावेत यासाठी नदी पात्राच्या परिसरात लोकसहभागाने देशी वृक्ष लागवडीला प्राधान्य देण्यात आले असून आतापर्यंत 5 लाख 14 हजार 916 वृक्षांची लागवड केली आहे.

याबाबत या प्रकल्पाचे जिओलॉजिस्ट डॉ. अनिल नारायणपेठकर म्हणाले, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नदी पुनर्जीवनाच्या प्रकल्पामध्ये नदीपात्रांचा भूशास्त्रीय अभ्यास करून भूजल पातळी वाढीसाठी आवश्‍यक उपाय केले जात आहेत. या उपायामुळे पावसाचे पाणी वाहून जाणे किंवा बाष्पीभवनाला पाणी झिरपण्याचा पर्याय दिला जातो. त्याचा परिणाम भूजल पातळी वाढीसाठी होत असल्याचे ते म्हणाले.

प्रकल्पात समाविष्ट जिल्हे आणि नद्या पुढीलप्रमाणे
लातूर : मांजरा, तवरजा, घरनी, डाल्टी, कसुरा, जना, मुदगल, रेणा
जालना : दुधना, गलघाटी, घनसावंगी, बिरवी नरोला, विद्रुपा, गोदावरी, सायंजना
जळगाव : वाकी
नाशिक : पझन, वाघाडी, कल्की, शिवंदी
उस्मानाबाद : बेनीतुरा, तेरणा, बोरी, भोगावती, हरणा
पुणे : राम नदी, शिवगंगा
अकोला : मोरणा
नंदुरबार : गोमाई
नागपूर : वेन्ना
सोलापूर : सीना, भोगावती
सातारा : माणगंगा