दिवाळीपूर्वी लोकलसह जादा ST Bus धावणार, राज्य सरकारची रेल्वेला शिफारस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा (Mumbai Local Train) आता सर्वांसाठी खुली करावी अशी शिफारस राज्य सरकारनं रेल्वे विभागाला केली आहे. राज्य सरकारनं रेल्वेला प्रस्ताव पाठवला आहे की, सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करावी. दिवसभरात 3 टप्प्यात सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्याची मागणी करण्यात आली आहे. इतकंच नाही तर राज्य परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) बसेसच्या ज्यादा फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळं आता दिवाळीपूर्वी राज्याचा अर्थगाडा रूळावर येणार आहे.

राज्यातील कोरोना (Corona) रुग्णांची आकडेवारी कमी होताना दिसत आहे. इतकंच नाही तर मृत्यूदरही कमी होत आहे. त्यामुळं आता राज्य सरकार लॉकडाऊन शिथील करताना दिसत आहे. त्यामुळंच आता जीम सुरू झाल्या आहेत. यानंतर आता लोकलही सुरू केली जाणार आहे. असंही समजत आहे की, रेल्वे विभागही याबाबत सकारात्मक विचार करत आहे.

प्रवासाची वेळ विभागून देण्याची मागणी

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर (Kishor Raje Nimbalkar) यांनी दिलेल्या प्रस्तावात सकाळी 7.30 वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी 8 ते 10.30 दरम्यान आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू ठेवा. तर सकाळी 11 ते दुपारी 4.30 या वेळेत सर्वसामान्यांसाटी लोकल प्रवासाची मुभा द्या. सायंकाळी 5 ते 7.30 ही वेळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ठेवा. तर सायंकाळी 8 पासून शेवटच्या लोकलपर्यंत सामान्य व्यक्तींना प्रवासाची मुभा द्या. तसंच दर एक तासानं महिला लोकल सोडा असंही नमूद करण्यात आलं आहे.

दिवाळीच्या सुट्टीत धावणार ज्यादा ST

दिवाळी (Diwali) सणानिमित्त प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळं एसटी महामंडळानं 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत सुमारे 1000 विशेष जादा फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बस स्थानकांवरून सुटणार असून टप्प्याटप्प्यानं आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड अनिल परब (Anil Parab) यांनी दिली.