अखेर पाकिस्ताननं कबूल केलंच ! कलम 370 भारताचा अंतर्गत मुद्दा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑगस्ट 2019 मध्ये भारताच्या संसदेत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 हे कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरची विभागणी लडाख आणि काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली. यावरुन पाकिस्तानने टीका करत तीव्र नापसंती दर्शवली होती. तसेच काश्मीरच्या मुद्यांवर भारत सरकार योग्य भूमिका घेत नाही, तोपर्यंत भारतासोबत कोणतेही व्यापारी संबंध ठेवले जाणार नाहीत, अशी भूमिका परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी घेतली होती. मात्र, आता आपल्या त्या भूमिकेवर पाकिस्तान ठाम असल्याचे दिसत नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी कलम 370 रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर आगपाखड केलेली दिसून आली. मात्र आता पहिल्यांदाच कलम 370 ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे पाकिस्ताननं मान्य केलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही भूमिका मांडली. मात्र, असं सांगताना त्यांनी कलम 35अ आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचे नमूद केलं.

आमच्यासाठी कलम 370 महत्त्वाचं नाही

शाह महमूद कुरेशी यांनी या मुलाखतीमध्ये कलम 370 आणि कलम 35अ या दोन्ही कलमांविषयी पाकिस्तानची भूमिका स्पष्ट केली. कलम 370 माझ्यामते महत्त्वाचं नाही. 35अ हे कलम पाकिस्तानसाठी महत्त्वाचं आहे. कारण या कलमाच्या माध्यमातून ते काश्मीरची भौगोलिक रचना बदलण्याचा प्रयत्न करु शकतात. जो ते आता करत आहेत. तो मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा होता, आहे आणि राहणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

370 वर सर्वोच्च न्यायालयात याचिका

कुरेशी यांनी कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयात देखील सुनावणी सुरु असल्याचे सांगितले. कमल 370 हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. काश्मीरच्या लोकांनी म्हटले आहे की तुम्ही आम्हाला वचन दिले होतं. काश्मीरचे नागरिक नाराज झाले आहेत. हे प्रकरण भारताच्या सर्वोच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. लोकांनी याविरोधात आवाज उठवला आहे. कलम 35अ किंवा 370 यासंदर्भात भारत सरकारने घेतलेल्या निर्णया विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या निर्णयांमधून भारताने कमावले कमी पण गमावले जास्त असे मानणारा मोठा वर्ग त्याठिकाणी आहे, असं कुरेशी यांनी सांगितले.

युद्ध ही आत्महत्याच ठरेल

भारत आणि पाकिस्तानमधील वाद सोडवण्यासाठी चर्चा हाच एकमेव मार्ग असल्याचे कुरेशी यांनी सांगितले. चर्चेशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. ही दोन्ही अणवस्त्रधारी राष्ट्र आहेत. या दोघांमध्ये काही तणावाचे मुद्दे आहेत. ते आज, उद्या किंवा परवा सोडवावेच लागतील. त्यावर युद्ध हा पर्याय नाही. युद्ध ही आत्महत्याच ठरेल, असेही कुरेशी यांनी म्हटले.