फासळ्यांपासून बनवला कृत्रिम कान ! शस्त्रक्रिया यशस्वी

लंडन : वृत्तसंस्था – अवयव प्रत्यारोपणाच्या अनेक घटना तुम्ही वाचल्या असतील. परंतु कृत्रिम कान बसवल्याचे तुम्ही ऐकले आहे का? आज आपण अशाच एका शस्त्रक्रियेबद्दल वाचणार आहोत. ज्यामध्ये एका मुलाला चक्क कृत्रिम कान बसवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा कृत्रिम कान त्या मुलाच्याच शरीरातील फासळ्यांच्या काही भागापासून विकसित करण्यात आला आहे. या मुलाचे नाव रीज ग्लिसन असून तो अवघ्या 11 वर्षांचा आहे. ब्रिटनमधील डाॅक्टरांची ही कामगिरी आहे. मुख्य म्हणजे ब्रिटनमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.
रीज ग्लिसन या मुलाला जन्मतःच कान नव्हते. ‘मायक्रोशिया’ नावाच्या एका अनुवांशिक आजारामुळे त्याची ही स्थिती झाली होती. अनुवांशिक कारणांमुळे दर सात हजारांमध्ये एका मुलात अशा प्रकारची स्थिती असते.
रीजच्या आईने सांगितले की, ‘तो लहान असताना अनेक मुले त्याला कान नसल्याने हिणवत, चिडवत असत आणि तो दुःखी होई. आपल्याला बाह्य कान नाहीत हे कुणाला समजू नये, यासाठी तो केसही कापून घेत नव्हता. त्याची या केविलवाण्या स्थितीतून सुटका करण्याचे कुटुंबीय व डॉक्टरांनी ठरवले. 2016 मध्ये लंडनच्या ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर पहिली शस्त्रक्रिया झाली.’
हॉस्पिटलचे सर्जन नील बल्सट्रोड यांनी सांगितले की, ‘कान बनवण्यासाठी फासळ्यांच्या कार्टिलेजचा वापर करण्यात आला. हे कान अगदी नैसर्गिक कानांसारखेच आहेत. यापूर्वीही शरीराच्याच अवयवांपासून कृत्रिम कान बनवले गेले आहेत; पण आता प्रथमच फासळ्यांचा वापर करून कान विकसित केले आहेत. हे कान पूर्णपणे सामान्य होण्यासाठी किमान सहा महिने लागतात आणि दोनवेळा शस्त्रक्रिया करावी लागते.