अरूणा ढेरे यांची ‘यक्षरात्र’ ही काव्यसूर मैफिल उत्साहात संपन्न  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आगामी माघ पौर्णिमेला ज्येष्ठ कवियित्री, लेखिका डाॅ. अरूणा ढेरे यांच्या ‘यक्षरात्र’ या काव्यसुरांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. पौर्णिमा महोत्सवानिमित्त पर्यटक निवास पानशेत येथे पर्यटकांच्या मनोरंजानासाठी ही काव्य मैफील रंगली होती. 19 फेब्रुवारीला ही काव्य मैफील पार पडली. याप्रसंगी कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून देण्यात आलेल्या ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमा अंतर्गत पुस्तक पेटीचे उद्घाटन करण्यात आले. प्रथम अरुणाताई ढेरे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर मैफीलीस सुरुवात करण्यात आली.

अरुणाताईंनी अनेक सुंदर कविता ऐकवून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या कवितांना उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळत होती. श्रोते मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या काव्य मैफीलीचा आनंद घेत होते. पौर्णिमेच्या चंद्रास अरुणाताईंनी खास कवितांनी दाद दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “पर्यटकांमध्ये साहित्याविषयी आवड निर्माण व्हावी, थोर साहित्यिकांचा त्यांना सहवास लाभावा या उद्देशाने पौर्णिमा महोत्सवाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. एमटीडीसीच्या राज्यभरातील रिसाॅर्टमध्ये दर पौर्णिमेच्या रात्री हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्याच्या विवध भागात निसर्गरम्य पर्यटनस्थळी वसलेल्या एमटीडीसीच्या रिसाॅर्टचा पर्यटकांना परिचय व्हावा हाही या उपक्रमाचा उद्देश आहे.”

तर महाराष्ट्र विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यावसायिक दीपक हरणे यांनी याबाबत आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले की, “अरुणाताई ढेरे यांचे काळोख आणि पाणी सारखे महाभारत व लोकपरंपरांचा परस्पर अन्वय लावणारे पुस्तक, कृष्ण किनारा सारखे राधा, कुंती, दौपदी यांचे भावबंध उलगडणारे पुस्तक, महाद्वार किंवा मैत्रेयी यांसारख्या लघु कादंबऱ्या अशा विविध साहित्यकृतींमधील कविता, गीतकाव्याच्या मैफीलीचा आनंद पर्यटकांना घेता आला.”

यावेळी प्रसन्न ट्रॅव्हल्सचे संजय नाईख, व्यावसायिक सुधीर मांडके, जय डुंबरे आणि पानशेत परिसरातील मान्यवर उपस्थित होते. या काव्य मैफीलीसाठी पर्यटक निवास पानशेतचे व्यवस्थापक वैभव पाटील आणि सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत हा कार्यक्रम यशस्वी केला.