‘5 भारतीय नागरिकांचं चीनी सैन्याकडून अपहरण’, काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असतानाच अरूणाचल प्रदेशच्या एका आमदारानं आता खळबळजनक ट्विट केलं आहे. चीनी सैनिंकांनी 5 भारतीय नागरिकांचं अपहरण केलं आहे असं या आमदारानं सांगितलं आहे. निनाँग एरींग असं या आमदाराचं नाव आहे. भारत आणि चीन यांच्या सीमेवरून या 5 जणांचं अपहरण झाल्याचं एरींग यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान कार्यालयाला देखील त्यांनी या पोस्टमध्ये टॅग केलं आहे.

एरींग यांनी ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, अप्पर सुबानसिरी जिल्ह्यातील 5 जणांचं अपहरण करण्यात आलं आहे. काही महिन्यांपूर्वीदेखील अशीच घटना घडली होती. याला चोख उत्तर देण्याची गरज आहे.

प्रकाश रिंगलिंग नावाच्या व्यक्तीनं त्याचा भाऊ प्रसाद रिंगलिंग आणि इतर 4 जणांचं चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं अपहरण केल्याची बाब सोशल मीडियावर मांडली होती. सेरा 7 भागातून हे अपहरण झाल्याचं त्यांनी सांगितलं. आणखी पोस्टमध्ये त्यांनी अपहरण झालेल्या तरुणांची नावंही लिहिली आहेत. तनू बाकार, प्रसाद रिंगलिंग, न्गारू दिरी, डोंगटू ईबिया, तोच सिंगकाम अशी या 5 तरुणांची नावं आहेत असं त्यांनी सांगितलं आहे.

भारत आणि चीनी सैन्य सध्या आमनेसामने आहे. सीमेवरील स्थिती ही तणावपूर्ण आहे. त्यामुळं लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी 3 सप्टेंबर रोजी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी LAC वरील स्थिती नाजूक असल्याचं सांगितलं होतं.