आदिवासींची हिंसक निदर्शने ; अरुणाचल प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचा बंगला जाळला

इटानगर : वृत्तसंस्था – अरुणाचल प्रदेशमध्ये सहा आदिवासी समुदायांना स्थायी निवासी प्रमाण पत्र देण्याच्या प्रस्तावाविरोधात मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागून संतप्त जमावाने उपमुख्यमंत्री चाव मेन यांचा बंगला जाळल्याची माहिती मिळाली आहे . या घटनेनंतर परिस्थितीवर ताबा मिळवण्यासाठी अरुणाचल प्रदेश सरकारने लष्कराला पाचारण केले असून इटानगरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्‍तव उपमुख्यमंत्री चाव मेन यांना नामसाई जिल्ह्यात हलविले आहे.

संचारबंदी लागू-

सहा आदिवासी समुदायांना स्थायी निवासी प्रमाण पत्र देण्याच्या प्रस्तावाविरोधात अरुणाचल प्रदेशमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारात एका नागरिकाचाही मृत्यू झाला. त्‍यामुळे आंदोलन आणखीनच चिघळले. संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्‍यामुळे रात्रीपासून या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबरोबरच पोलिसांनी २१ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या परिसरात आंदोलकांनी जवळपास ५० गाड्या जाळल्या व १०० गाड्यांचे नुकसान केले तसेच ५ सिनेमागृहांना आग लावण्यात लावली . राज्यातील अशांततेचे वातावरण पाहता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण –

स्थायी रहिवासी प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एका पॅनलच्या शिफारसींविरोधात स्थानिक आंदोलन करत आहेत. अनेक दशकांपासून अरुणाचलमध्ये राहणारे मात्र तेथील मूळ निवासी नसणाऱ्या लोकांना हे प्रमाणपत्र जारी केले जात आहे. गैर अरुणाचल प्रदेश अनुसूचित जनजातीच्या (एपीएसटी) लोकांना स्थायी निवास प्रमाणपत्र (पीआरसी) मिळू नये, अशी आंदोलकांची मागणी आहे. पर्यावरण आणि वनमंत्री नबाम रेबिया यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त उच्च शक्ती समितीने तथ्यांची निश्चिती केल्याविनाच आपला अहवाल सादर केला होता, असा आरोपही आंदोलक करत आहेत.