AAP ची आता गोवा जिंकण्याची इच्छा, दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापण्याचा CM केंजरीवालांचा निर्णय

पणजी : पोलीसनामा ऑनलाईन –  गोवा (Goa) जिंकण्याची इच्छा ठेवलेल्या आम आदमी पक्षाने (AAP)विविध प्रकारे आपले काम गोव्यात सुरु ठेवले आहे. आपने गोव्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत एक जागा जिंकली. त्यानंतर विजयी उमेदवाराला स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल( Arvind Kejriwal) यांनी फोन करून अभिनंदन केले होते. त्यानंतर आता दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन केली जाईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी जाहीर केले आहे. अकादमी स्थापन करण्याचा निर्णय हा शुक्रवारी (दि. 8) मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणून घेतला गेला, असेही केजरीवाल यांनी जाहीर करून गोमंतकीयांना आश्चर्याचा पण सुखद धक्का दिला आहे.

कोंकणी ही गोव्याची राज्यभाषा आहे व राज्यभर सगळीकडेच कोंकणी बोलली जाते. घटनेच्या आठव्या परिशिष्टातही कोंकणीला स्थान आहे. मराठी ही राजभाषा कायद्यात सहभाषा आहे. कोंकणीला प्रोत्साहन देण्याचे आमचे धोरण आहे व त्यामुळे दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन करू, असे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. कोंकणी बोलणाऱ्या सर्वांचे आपण अभिनंदन करतो व जे कोंकणीवर प्रेम करतात त्या सर्वांचे देखील अभिनंदन करतो, असे केजरीवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, केजरीवाल यांची ही नवी चाल गोव्यात आम आदमी पक्षाला मदतरुप ठरेल काय याविषयी भाजपामध्ये व विरोधी काँग्रेस पक्षातही चर्चा सुरू झाली आहे. गोव्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर असतानाच 1987 साली कोंकणी भाषा राज्यभाषा झाली. कोंकणीसाठी त्यावेळी मोठे आंदोलन झाले होते. मात्र, केंद्रात व गोव्यात अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने कधी दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन केली नाही. गोव्यात कोंकणी अकादमी आहे. भाजपनेही अनेक वर्षे सत्तेत राहून देखील कधी गोव्याबाहेर कोंकणी अकादमी स्थापन करण्याचा विचार केला नव्हता.