‘भाजपा आणि काँग्रेस दोघेही मार्केटमध्ये बसलेत, एक विकायला तर दुसरा खरेदीला’ : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीकास्त्र सोडलं आहे. आमदारांना विकत घेत सरकार पाडणं हे चांगलं राजकारण नाही. हा मतदारांचा विश्वासघात आहे. कोणताही पक्ष आमदार विकत घेऊन मतदारांचा विश्वास तोडत असेल तर ही, बाब लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलतं होते.

देशाने दिल्ली मॉडेल स्वीकारावं

अरविंद केजरीवाल यांनी यावेळी कोरोना संसर्ग तसेच देशातील राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, देशातील कोरोना रुग्णसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेली दिल्ली आता दहाव्या क्रमांकावर गेली आहे. तसेच दिल्लीचा रुग्ण बरे होण्याचा रेट ८८ टक्क्यांवर पोहचला आहे. मात्र, आता आपण लढाई जिंकलो असे म्हणणे चुकीचं ठरेल, देशाने दिल्ली मॉडेल स्वीकारावं, असे मत केजरीवाल यांनी व्यक्त केलं आहे.

‘एक विकायला दुसरा खरेदी करायला’

अरविंद केजरीवाल यांनी राज्यस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर बोलताना काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षावर टीका केली आहे. मध्यप्रदेशात सरकार बनवण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्च रोजी लॉकडाऊन ची घोषणा केल्याचा दावा त्यांनी केला. देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे, चीन आपल्या हद्दीत घुसला आहे. अशा काळात कोणत्याही सत्ताधारी पक्षाने निवडून आलेल्या राज्य सरकारमध्ये हस्तक्षेप करु नये. आमदार विकत घेऊन सरकार पाडणे हे चांगले राजकारण नाही. तो जनतेचा विश्वासघात आहे. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष दोषी आहेत. बाजारात बसून एक विकायला तर दुसरा खरेदी करायला तयार असल्याची खोचक टीका केजरीवाल यांनी केली आहे.

काँग्रेसला मतदान म्हणजे भाजपाचे सरकार

कर्नाटकात जनतेने काँग्रेसचे सरकार बनवले होते, पण काँग्रेसने सत्तेची माळ भाजपाच्या गळ्यात टाकली. गोव्यात नागरिकांनी काँग्रेसला मते दिली, काँग्रेसने ती भाजपाला विकून टाकली. मध्य प्रदेशमध्ये जनतेने काँग्रेसला मते दिली, काँग्रेसने ही मते भाजपाला विकली. आता काँग्रेसला मतदान करणे म्हणजे काँग्रेस आपली मते विकून भाजपाचे सरकार बनवणे असे समीकरण झाल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.