16 फेब्रुवारीला ‘रामलीला’ मैदानावर 10 वाजता ‘शपथ’ घेणार केजरीवाल, संपूर्ण दिल्लीकरांना ‘आमंत्रण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अरविंद केजरीवाल यांना सर्वानुमते आम आदमी पक्षाकडून विधिमंडळ पक्ष नेता म्हणून निवडण्यात आले आहे. बुधवारी केजरीवाल यांच्या राहत्या घरी निवडून आलेल्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत मनीष सिसोदिया यांनी अरविंद केजरीवाल यांना विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडण्याचा प्रस्ताव ठेवला आणि या ठरावास सर्वानुमते मंजूर करण्यात आले. आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह आणि पंकज गुप्ता हे या बैठकीचे निरीक्षक होते. सर्वांनी अरविंद केजरीवाल यांना एका मताधिक्याने विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडले. केजरीवाल यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावाला सर्व आपच्या आमदारांनी एकमताने पाठिंबा दर्शविला. दरम्यान, केजरीवाल हे 16 फेब्रुवारीला रामलीला मैदानावर सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याकडून संपुर्ण दिल्लीला आमंत्रण देण्यात आले आहे.

त्याचवेळी रामनिवास गोयल म्हणाले की, शपथविधी सोहळा १६ तारखेला रामलीला मैदानावर होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान रामलीला मैदानावर होऊ शकतो. पक्षाच्या काही लोकांना अशी इच्छा आहे की शपथविधी सोहळा सन २०१५ प्रमाणे १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केला जावा, परंतु काही लोकांची इच्छा आहे की रविवारी हा कार्यक्रम असावा जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तथापि, शपथविधी सोहळा कधी होईल याची तारीख निश्चित झालेली नाही. केजरीवाल यांच्या शपथविधीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिगर भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्री देखील या शपथविधीला हजर राहतील असे बोलले जात आहे.

मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा मोठा विजय मिळविला आहे. दिल्लीतील ७० जागांपैकी ६२ जागांवर आप ने बाजी मारली आहे. तर भाजपच्या वाट्याला केवळ आठ जागाच येऊ शकल्या. मागील वेळेप्रमाणे या वेळीही कॉंग्रेसचे खाते उघडले नाही. एकूण मतांपैकी ‘आप’ला ५३.६ टक्के मतं मिळाली, तर भाजपाला ३८.५ टक्के मतं मिळाली. काँग्रेसच्या वाट्याला केवळ ४.२६ टक्के मतं आली. या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानले आणि त्यांना सार्वजनिक पद्धतीने ‘आय लव्ह यू’ म्हटले. केजरीवाल सरकारने दिल्लीत विजयाची हॅट्रिक केली आहे.