अरविंद शिंदे यांना न्यायालयाकडून हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना न्यायालयाने हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या अर्जावर पोलिसांना २७ फेब्रुवारी रोजी बाजू मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सोमवारी महापालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या कार्यालयात विरोधी पक्षाकडून आंदोलन केले गेले. त्यावेळी उपस्थित निंबाळकर आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. त्यावेळी निंबाळकर यांना मारहाण झाली होती. याचे पडसाद महापालिका वर्तुळात उमटले असून काँग्रेसचे गटनेते शिंदे आणि नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध आणि आणखी कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या गुन्ह्यात मंगळवारी शिंदे यांच्या तर्फे एडवोकेट विजय ठोंबरे आणि रुपाली पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जाची सुनावणी सत्र न्यायाधीश ए.वाय. थत्ते यांच्यासमोर झाली. शिंदे यांनी निंबाळकर यांना मारहाण केली नाही किंवा सरकारी कामात अडथळा आणलेला नाही. जलपर्णी काढण्याच्या निविदेतील गैरप्रकार समोर आणला म्हणून त्या द्वेषा पोटी शिंदे यांच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे त्यांना अटक पूर्व जामीन मिळावा अशी मागणी त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. पोलिसांनी या अर्जावर बाजू मांडावी असे आदेश न्यायालयाने दिले आहे .तोपर्यंत शिंदे यांना हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. शिंदे यांचा पासपोर्ट जमा करून घेण्याची अट न्यायालयाने घातली आहे.