सह्याद्री क्लासिक शर्यतीत अरविंदचे वर्चस्व, जावळीचा राजा किताबासह विक्रमी वेळेची नोंद

पुणे : भारताचा आंतरराष्ट्रीय स्पर्धक आणि माजी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक विजेता अरविंद पन्वर याने ओएनपी सह्याद्री क्लासिक सायकल शर्यतीत (Sahyadri Classic race)  निर्विवाद वर्चस्व राखत अव्वल क्रमांक पकावला. प्रतापगडला जाणाऱ्या अंबेनळी घाटाचा मार्ग सर्वांत कमी वेळेत पूर्ण करीत त्याने जावळीचा राजा हा किताबही मिळविला. सुदर्शन देवर्डेकर याने दुसऱ्या क्रमांकासह महाराष्ट्रासाठी लक्षवेधी कामगिरी नोंदविली.

साडे तीन लाख रुपयांची बक्षीस रक्कम असलेली ऑईस्टर अँड पर्ल हॉस्पीटल पुरस्कृत शर्यत महाबळेश्वर परिसरातील चार घाटांच्या आव्हानात्मक मार्गावर पार पडली. २१० किलोमीटर स्पर्धात्मक अंतराच्या शर्यतीत अरविंदने नवा शर्यत विक्रम नोंदविला. २०१९ मधील पहिल्या शर्यतीचा विजेता माँटी चौधरी याला चौथा क्रमांक मिळाला. तेव्हा माँटीने चार तास दोन मिनिटे वेळ नोंदविली होती. माँटीचा प्रशिक्षक असलेल्या अरविंदने तीन तास ५१ मिनिटे ३६ सेकंद नोंदविली. मुळचा मेरठचा अरविंद पूर्व रेल्वेत नोकरी करतो.

चार तासांपेक्षा कमी वेळ नोंदविलेला तो पहिलाच व एकमेव स्पर्धक ठरला. ३२ किलोमीटर अंतराचा पश्चिम घाटांमधील सर्वाधिक अंतराचा घाट त्याने एक तास २९ मिनिटे ३६ सेकंद म्हणजे दिड तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण केला. अरविंदला एक लाख एक रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस तसेच जावळीचा राजा किताबाचे दहा हजार एक रुपये अशी बक्षीस रक्कम मिळाली.

अरविंदने स्पर्धेचे संयोजन, संकल्पना आणि स्वरुपाविषयी उत्स्फूर्तपणे सांगितले की, केवळ चढाईच्या अंतराचा निकष निकालासाठी असल्यामुळे स्पर्धक निश्चिंतपणे सायकलिंग करू शकतात. इतकी चढाई आणि असे स्वरुप असलेली ही देशातील एकमेव सायकल शर्यत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी आणि तंदुरुस्तीची पातळी उंचावण्यासाठी ही शर्यत आदर्श ठरते. पुढील वर्षी माझ्यासह भारताचे इतरही आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धक भाग घेण्यास आतूर असतील.

सुदर्शनने चार तास ९ मिनिटे ५८ सेकंद वेळेत दुसरा क्रमांक मिळविला. 30 वर्षांचा सुदर्शन मुळचा कोल्हापूरचा असून तो पुण्याचा रहिवासी आहे. तो आयटी इंजिनीयर आहे. याआधी त्याने सिंहगड आणि नाशिक येथील शर्यतींत यश मिळविले होते. सुदर्शनला ५० हजार एक रुपये, तर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी देवेंदर कुमार याला २५ हजार रुपये मिळाले.

४० वर्षे व त्यावरील वयाच्या स्पर्धकांनी चारही घाटांचा मार्ग असलेल्या मास्टर्स गटात कस अजमावला. यात महेश अय्यरने पहिला क्रमांक मिळविला. महेश आयटी इंजिनियर आहे. त्याला २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.

या गटात १६ स्पर्धकांनी शर्यत पूर्ण करीत पदक आणि प्रमाणपत्राची कमाई केली. यात स्वतः संयोजक आणि प्रायोजक डॉ. अविनाश फडणीस यांचा समावेश होता. त्यांनी एकूण तब्बल आठ तास सायकलिंग करीत ही कामगिरी नोंदविली. प्रशांत तिडके यांनी अँजिओप्लास्टी झाल्यानंतर जवळपास एका वर्षाने भाग घेत शर्यत पूर्ण केली.

महिला गटात भाग घेतलेल्या आठ पैकी सहा जणींनी शर्यत पूर्ण केली. त्यात अंजली रानवडे हिने पहिला क्रमांक मिळविला. घाटाचा दुसरा टप्पा तिने दोन तासांपेक्षा कमी वेळेत (१.५६.५०) पूर्ण केला. अंजली नेरूळची रहिवासी असून 18 वर्षांची आहे. ती डी. वाय. पाटील महाविद्यालयात शिकते. ती राष्ट्रीय खेळाडू असून रोड रेस तसेच ट्रॅकवरील शर्यतींत तिने पदके मिळविली आहेत. अंजलीला दहा हजार एक रुपयांचे बक्षीस मिळाले.

दोन घाटांच्या मार्गाचे अंतर असलेल्या पुरुष खुल्या गटात ३७ स्पर्धकांनी शर्यत पूर्ण केली. यात नगरच्या एमआयआरसीच्या (मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजीमेंट सेंटर) स्पर्धकांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. शारीब व्हिकार आणि संजीत सिंग यांच्यात कडवी झुंज होऊन शारीब अवघ्या एका सेकंदाने विजेता ठरला. पहिला घाट त्याने ४१ मिनिटे १८ सेकंद वेळेत पूर्ण करताना संजीतपेक्षा दोन सेकंद सरस वेळ नोंदविली. मग दुसऱ्या घाटात संजीत एका सेकंदांनी कमी पडला. शारीबची वेळ एक तास ४७ मिनिटे ५३ सेकंद इतकी होती.

संयोजक डॉ. फडणीस यांनी स्पर्धा कोणतीही दुर्घटना न घडता सुरळीतपणे पार पडल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पुढील वर्षी आणखी भव्य संयोजन करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्पर्धक समन्वयक डॉ. आदित्य पोंक्षे यांनी स्वयंसेवकांनी अथक परिश्रम केल्यामुळे स्पर्धा यशस्वी झाल्याचा आवर्जून उल्लेख केला.

स्पर्धेच्या तांत्रिक संयोजनाची जबाबदारी सिद्धार्थ हिवरेकर यांच्याकडे होती.