फेब्रुवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर, ‘हाऊडी मोदी’च्या धर्तीवर होणार ‘केम छो ट्रम्प’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टेक्सासमध्ये ह्यूस्टनमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी 50 हजार उपस्थितांशी संवाद साधला. आता असाच एक कार्यक्रम डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर असताना आयोजित करण्यात येईल. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाचे नाव सध्या गुजरातीमध्ये ‘केम छो ट्रम्प’ म्हणजेच ‘ट्रम्प कसे आहात’ असे ठेवण्यात येणार असल्याचे कळते.

ट्रम्प यांची मागणी –
या कार्यक्रमाचे आयोजन अहमदाबादमध्ये होईल. परंतु सूत्रांच्या मते अमेरिकेचे म्हणणे आहे की कार्यक्रम दिल्ली – एनसीआरमध्ये करण्यात यावा. असे सांगण्यात येत आहे भारत दौऱ्यावर येणारे ट्रम्प दिल्लीतून बाहेर कुठेही जाण्याच्या मूडमध्ये नाही. कारण त्यांच्याकडे कमी वेळ आहे.

अहमदाबादमध्ये होऊ शकतो कार्यक्रम –
ट्रम्प यांचे म्हणणे आहे की कार्यक्रम दिल्लीत व्हावा परंतु भारत सरकारच्या मते ह्यूस्टनला जशी गर्दी झाली होती तशी गर्दी अहमदाबादमध्ये नियंत्रण करणे सोपे होईल. याशिवाय नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध होत असल्याने कार्यक्रम अहमदाबादमध्ये करण्याचा सरकारसाठी जास्त फायदेशीर ठरेल.

निवडणूकीत होणाऱ्या फायद्याचा विचार –
ट्रम्प टीमला देखील वाटते की कार्यक्रम अशा ठिकाणी व्हावा ज्याचा परिणाम अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणूकीत व्हावा. त्यामुळे कार्यक्रम गुजरातमध्ये झाला तर त्याचा फायदा ट्रम्प यांना होईल. गुजरातचे अनेक लोक अमेरिकेत राहतात. या कार्यक्रमात मूळ भारतीयांना अमेरिकेहून भारतात बोलावण्यात येऊ शकते.

मोटेरा स्टेडियमध्ये होऊ शकतो कार्यक्रम –
सध्या या कार्यक्रमाचे स्थळ निश्चित करण्यात आलेले नाही, परंतु अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. येथे जवळपास 1,10,000 लोक बसू शकतात. परंतु या स्टेडियममध्ये सध्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या स्टेडियमचे काम पूर्ण होईल की नाही याबाबत शंका आहे. अहमदाबादमध्ये पहिल्यांदाच अनेक कार्यक्रमाचे आयोजन झाले आहे. असे सांगण्यात येत आहे की ट्रम्प यांचा भारत दौरा 24-26 फेब्रुवारीदरम्यान होऊ शकतो. ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ताजमहल पाहण्यासाठी आग्राला देखील जाऊ शकतात.

फेसबुक पेज लाईक करा –