…म्हणून मुंबईसह कोकणाला टोळधाडीचा धोका नाही, केंद्रीय कृषी मंत्रालयाचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईसह कोकणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईकरांना नव्या चिंतेने ग्रासले आहे. ही चिंता आहे टोळधाडीची. सोशल मीडियावर मुंबईत टोळ दिसू लागल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, केंद्रीय कृषी मंत्रालयाने टोळधाडी संदर्भात माहिती देणाऱ्या द लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने मुंबईला टोळधाडीचा धोका नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवस यांनी मुंबईसाठी टोळधाडीसंदर्भात कोणताही इशारा देण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले.

https://twitter.com/DeShobhaa/status/1265930343644901377

भंडारा जिल्ह्यात तुमसर येथे बुधवारी रात्री टोळधाड होती. तेथून गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास नदी ओलांडून तिने मध्यप्रदेशात प्रवेश केला आहे. मुंबईला टोळधाडसंदर्भात कोणताही इशारा दिलेला नाही. सध्या फिरत असलेली माहिती ही अफवा आहे, अशी माहिती दिवस यांनी दिली. कृषी खात्यातील कर्मचारी याबाबत दक्ष असून टोळधाडीच्या मागावर असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुवारी मुंबईतील अनेक लोकांनी सरकारी यंत्रणांना फोन करून मुंबईत टोळ दाखल झाले आहेत का या संदर्भात चौकशी केल्याचे एका इंग्रजी पेपरच्या वृत्तामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. तर दुसऱ्या एका इंग्रजी पेपरने प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या ट्विटरच्या हवाल्याने मुंबईत टोळ दिसत असल्याचे वृत्त दिलं.
रविवारी मध्यप्रदेश व राजस्थानातून महाराष्ट्रात कीटकांचा झुंड धडकला. सर्वात आधी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात कीटकांनी पिकांवर हल्ला केला. फेटरी, खानगाव शिवारासह आमनेर गांदी या परिसरात टोळ आढळून आले. यात पिकांचे मोठं नुकसान झाले. गुरुवारी दुपारी हे टोळ भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि तुमसार तहसीलमधील गावात दिसल्याचे वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर मुंबईमध्ये टोळ दिसत असल्याचा दावा करणारे व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला. टोळ मुंबईत दाखल झाले. गोरेगाव आणि मलाडमध्ये टोळ मोठ्या संख्येने दिसून येत आहेत, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते.