श्रीलंकेवर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याने, राज्यात हुडहुडी वाढली

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   श्रीलंकेवर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून, तर उत्तरेकडून हिमालयाच्या पायथ्यापासून थेट थंड वारे नाशिकच्या दिशेने वाहत असल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात ८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात नीच्चांकी नोंद झाली आहे. किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी भरली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या दिशेत दरवर्षी बदल होत असल्याकारणाने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा थंडीचा हंगाम लवकर सुरू झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी भरली आहे. १२ नोव्हेंबर २०१९ रोजी २० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले होत. आज १२ नोव्हेंबर २०२० रोजी ८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावरील हवामान विभागात झाली आहे.

दररोज किमान पाऱ्यात घसरण होत असल्याने निफाड, लासलगाव, चांदोरी, सायखेडा ,कसबे सुकेने गाव यासह तालुक्यांतील गावे चांगलीच गारठून निघाली आहेत. या गाड्यातून मिळवण्यासाठी ठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत, तर उबदार कपडे परिधान करणे, गरम पदार्थ सेवन केले जात आहेत.

थंडीत दरवर्षी वाहणारे वारे हे दुबई, पाकिस्तान आणि जम्मू व काश्मीर असे वाहतात, पण थंड वाऱ्यांच्या दिशेत दरवर्षी बदल होत आहे. त्यामुळे सण २०१५ मध्ये दुबई , पाकिस्तानमधील कराची, राजस्थान आणि उत्तराखंड असे गेले होते तर २०१८ आणि १९ मध्ये दुबई, पाकिस्तानमधील कराची, गुजरात, नाशिक, विदर्भ मार्गे कलकत्ता असे गेले होते. मागील वर्षी क्यार चक्रीवादळामुळे थंडी उशिराने सुरू झाली होती. यंदा हे वारे २०१८-१९च्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे थंडी लवकर सुरू झाली आहे.

श्रीलंकेवर चक्रीवादळ सुस्थितीत निर्माण झाल्याने ढगाळ वातावरण होत किमान तापमानात दोन दिवसांनंतर घट होत थंडीपासून थोडासा दिलासा मिळणार आहे, तर १७,१८,१९ तारखेला नाशिक जिल्ह्यात निफाड, नाशिक, सिन्नर सह काही ठिकाणी पाऊस पडणार असून पुन्हा २६ नोव्हेंबरपासून नाशिकसह राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

दिनांक किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
२ नोव्हेंबर २०२० १८.५
४ नोव्हेंबर २०२० १६
५ नोव्हेंबर २०२० १४
६ नोव्हेंबर २०२० १२
७ नोव्हेंबर २०२० ११.५
८ नोव्हेंबर २०२० १२.५
९ नोव्हेंबर २०२० ११
१० नोव्हेंबर २०२० १०
११ नोव्हेंबर २०२० ९
१२ नोव्हेंबर २०२० ८.५