’30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद होईपर्यंत HM अमित शहा झोपले होते का ?’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – हैदराबादमधील एका सभेत बोलताना एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राेहिंग्यांच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जर ३० हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद होत असेल, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एवढं सर्व होईपर्यंत झोपा काढत होते का? असा सणसणीत टोला ओवेसींनी लगावला आहे.

 

 

ओवेसी म्हणाले की, मतदार यादीमध्ये ३० हजार रोहिंग्यांची नोंद आहे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यावेळी काय करत आहेत? ३० ते ४० हजार रोहिंग्यांची नोंद मतदार यादीमध्ये कशी झाली, याकडे लक्ष देण्याचं काम त्यांचं नाही का? भाजपचे दावे खरे असतील तर त्यांनी संध्याकाळपर्यंत अशा एक हजार नावांची तरी यादी द्यावी,” असं आव्हान त्यांनी दिलं आहे. द्वेष निर्माण करणं हाच भाजपचा मुख्य हेतू आहे. हा वाद हैदराबाद आणि भाग्यनगरमध्ये आहे. आता कोण जिंकणार हे तुम्हीच ठरवणार आहात” असंही ओवेसी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबते वृत्त दिले आहे.

लव्ह जिहादवरून हल्लाबोल
ओवेसी यांनी यापूर्वीही लव्ह जिहादवरून भाजपवर निशाणा साधला होता. विशेष विवाह कायदा रद्द केल्यास घटनेतील कलम 14 आणि 21 चं उल्लंघन होणार आहे. त्यामुळे भाजपने संविधानाचा अभ्यास करायला हवा. बेरोजगार झालेल्या तरुणांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप नाटक करत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

ओवेसी जिनांचे अवतार
सोमवारी ग्रेटर हैदराबाद येथे भाजप नेते तेजस्वी सूर्य यांनी असदुद्दीन ओवेसींवर हल्लाबोल केला होता. त्यावेळी त्यांनी ओवेसी हे मोहम्मद अली जिना यांचे अवतार असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही तर त्यांना मत देण्याचा अर्थ म्हणजे भारताविरुद्ध मत देणं आहे. ही फक्त एक महानगरपालिका निवडणूक नाही, जर तुम्ही ओवेसी यांना मतं दिली तर ते महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेशात मजबूत होतील, असे सूर्या यांनी म्हटले.

You might also like