असदुद्दीन ओवैसींना पसंत नाही आलं ‘100 कोटी Vs 15 कोटी’, वारिस पठाणांची केली बोलती बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे नेता वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी कारवाई केल्याचे समोर आले आहे. या वक्तव्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी वारिस पठाण यांना माध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे. जोपर्यंत पक्ष परवानगी देत नाही तोपर्यंत वारिस पठाण जाहीरपणे विधान करू शकणार नाहीत.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वारिस पठाण यांनी कर्नाटकच्या गुलबर्गा येथील जाहीर सभेत वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, ‘हम 15 करोड़ ही 100 करोड़ लोगों पर भारी हैं. यह बात याद रख लेना.’ ज्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली, असदुद्दीन ओवैसी यांनी देखील या विधानाचा निषेध केला होता.

वारिस पठाण हे AIMIM चे प्रवक्ता आहेत. रॅलीदरम्यान वारिस पठाण म्हणाले, ‘हमने ईंट का जवाब पत्थर से देना सीख लिया है. मगर हमको इकट्ठा होकर चलना पड़ेगा. आजादी लेनी पड़ेगी और जो चीज मांगने से नहीं मिलती है, उसको छीन लिया जाता है.’

वारिस पठाण यांच्या विधानावरून राजकीय गदारोळ

वारिस पठाण यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी कोणत्याही धर्माचे नाव घेतले नाही किंवा कोणाविरूद्ध काही बोललो देखील नाही. तथापि, या विधानाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी देखील वारिस पठाणच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र स्वरूपाची टीका केली होती. त्यांनी म्हटले की, पठाण यांना तातडीने अटक करण्यात यावी. तेजस्वी यांनी भाजपा वर देखील निशाणा साधला आणि म्हणाले की AIMIM भाजपाच्या बी टीम सारखे काम करत आहे.

विशेष म्हणजे वारिस पठाण व्यतिरिक्त एआयएमआयएमशी संबंधित आणखी एक विवाद समोर आला होता. असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत एका तरुणीने पाकिस्तानच्या जयघोषाचे नारे लावले होते. त्यानंतर त्या तरुणीस अटक करण्यात आली आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी हे वक्तव्य खोटे म्हटले आहे आणि कारवाईची मागणी देखील केली आहे.