तर ओवैसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून जावे लागेल

हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करीत आहेत. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेस पक्षाकडून भाजपला लक्ष बनवण्यात येत असून भाजपवर वारंवार टिका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ओवैसींना थेट इशारा दिला आहे. भाजपा सत्तेत आल्यास ओवैसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल, असं आदित्यनाथ यांनी म्हटलं.

योगी आदित्यनाथ यांच्या या इशाऱ्याला ओवैसी प्रत्युत्तर देणार आहेत. याचे संकेत त्यांनी ट्विटरवरुन दिले आहेत. ‘संध्याकाळी ७ ते १० दरम्यान होणाऱ्या सभेतून योगींना उत्तर दिलं जाईल,’ असं ट्विट ओवैसींनी केलं आहे. हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ ओवैसींवर बरसले. ‘मी तुम्हाला विश्वास देतो की, तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास ओवैसींनी निजामासारखं हैदराबाद सोडून पळावं लागेल,’ असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

याआधी भाजपाचे आमदार राजा सिंह यांनी ओवैसींबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. ‘ओवैसींचं शीर धडावेगळं केल्यावरच मी संतुष्ट होईन,’ असं राजा सिंह यांनी म्हटलं होतं. याआधी असदुद्दीन ओवैसी यांनी सैदाबादमधील एका सभेत बोलताना भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. ‘मुस्लिमांची धार्मिक स्थळं, मदरसे बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ असा आरोप त्यांनी केला होता. तेलंगणात ७ डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानंतर ११ डिसेंबरला मतमोजणी होईल.