आसाराम बापूला कारागृहात कोरोनाची बाधा, ICU मध्ये दाखल

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन – बलात्काराच्या प्रकरणात राजस्थानमधील जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची बुधवारी (दि. 5) रात्री अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्याला महात्मा गांधी रुग्णालयात आयसीयूमध्ये (ICU) दाखल केले आहे. 3 दिवसांपूर्वी आसाराम बापूला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली होती. त्यानंतर जेल प्रशासनाने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून आसाराम बापूला कोरोनाची सौम्य लक्षण दिसत होती. सोमवारी (दि.3) त्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर बुधवारी (दि.5) त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले होते. त्याची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने आयसीयूमध्ये दाखल केले आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. या कारागृहातील जवळपास एक डझन कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर या कोरोनाबाधित कैद्यांना कारागृहातील डिस्पेंसरीमध्ये आयसोलेट केले होते. दरम्यान यापूर्वी 18 फेब्रुवारीला आसाराम बापूला छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले होेते.