लैंगिक शोषणाप्रकरणी तूरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूची प्रकृती बिघडली

जयपूर : पोलिसनामा ऑनलाईन – अल्पवयीन मुलींच्या केलेल्या लैंगिक शोषणाप्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा राजस्थानमधील जोधपूर येथील कारागृहात भोगत असलेल्या आसाराम बापू याची मंगळवारी रात्री प्रकृती अचानक बिघडली. सध्या त्याच्यावर महात्मा गांधी रुग्णलयात उपचार सुरु आहेत.

आसाराम बापूला अस्वस्थ वाटू लागल्याने सुरुवातीला कारागृहातील दवाखान्यात त्याच्यावर तासभर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी आसारामने गुडघ्याचा त्रास तसेच रक्तदाबाचा त्रास होत असून अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले.

महात्मा गांधी रुग्णालयात आसाराम बापूला आणले तेव्हा त्याचे काही भक्तही तिथे पोहोचले. त्यांना पोलिसांनी बाहेर काढले. रुग्णालयातील एक्स-रे रूममध्ये आसारामला संपूर्ण वेळ ठेवण्यात आले. तिथे त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्याशिवाय कार्डिओलॉजीच्या डॉक्टरांनाही बोलावण्यात आले. दरम्यान, आसारामची ईसीजी रिपोर्ट सामान्य आला आहे.सर्व वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर आसारामची रवानगी महात्मा गांधी रुग्णालयातून मथुरादास माथूर रुग्णालयातील आयसीसीयू वॉर्डमध्ये करण्यात आली. आसाराम आजारी पडल्याचे समजताच त्याचे भक्तही मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमा झाले.