Birthday SPL : विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्यामुळं आयुष्यभर सिंगल राहिल्या आशा पारेख ! स्वत:च केला ‘खुलासा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा आज (शुक्रवार दि 2 ऑक्टोबर) 78 वा वाढदिवस आहे. गुजरातच्या महुआ येथे मध्यमवर्गीय कुटुंबात आशा पारेख यांचा जन्म झाला. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक हिट सिनेमात काम केलं आहे. त्यांची पर्सनल लाईफही खूप चर्चेत राहिली आहे. दिग्गज निर्माते, दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्या सोबतचं त्यांचं नातं नेहमीच चर्चेत राहिलं. परंतु त्यांचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. एका मुलाखतीत त्यांनी स्वत: याबाबत खुलासा केला होता.

नासिर हुसैनं यांनी आशा पारेख यांना दिल देके देखो या सिनेमासाठी साईन केलं होतं. हा सिनेमा हिट झाला होता अन् आशा रातोरात स्टार झाल्या. यानंतर नासीर यांनी आशाला आपल्या 6 सिनेमांसाठी साईन केलं. जब प्यार किसी से होता है, फिर वो ही दिल लाया हूं, तिसरी मंजिल, बहारों के सपने, प्यार का मौसम, कारवां असे 6 च्या 6 सिनेमे हिट झाले होते.

एका मुलाखतीत बोलताना आशा म्हणाल्या की, “नासिर साहेब हे माझ्या आयुष्यात आलेले पहिले आणि शेवटचे पुरुष होते. त्यांच्यावर माझं खूप प्रेम होतं. पंरतु मला त्यांचं घर तोडायचं नव्हतं. माझ्या आणि त्यांच्या कुटुंबात कधीच मतभेद झाले नाहीत. मला कधीच त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलांपासून विभक्त करायचं नव्हतं. याच भीतीनं मी कधी त्यांच्यासोबत लग्न केलं नाही.”

जेव्हा नासीर आशाच्या प्रेमात पडले होते तेव्हा ते विवाहित होते आणि त्यांना दोन मुलंही होती. याचा उल्लेख आशा यांनी त्यांचे आत्मचरित्र द हिट गर्ल मध्ये केला आहे. खालिद मोहम्मद लिखित हे आत्मचरित्र 2017 मध्ये प्रकाशित झालं होतं.