‘सुपर डान्सर’ शोमध्ये आशा पारेख यांनी दिली ‘या’ गोष्टीची कबुली

मुंबई : वृत्तसंस्था – प्रसिद्ध शो ‘सुपर डान्सर’ मध्ये बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान आणि आशा पारेख या सेलेब्रेटींनी हजेरी लावली. या विशेष भागात स्पर्धकांबरोबर वहिदा रेहमान आणि आशा पारेख यांनी दमदार परफॉर्मन्स सादर केला. तसेच त्यावेळेच्या बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी अनेक गोष्टी सांगतानाच त्यांचा बॉलिवूडमधील प्रवास कसा सुरू झाला याबद्दल अनेक गोष्टी त्यांनी शेअर केल्या.

वहिदा रहेमान आणि आशा पारेख अनेक वर्षांपासून जिवलग मैत्रिणी आहेत. या शोमध्ये स्पर्धक आणि त्यांचे गुरू वहिदा रेहमान आणि आशा पारेख यांच्या गाण्यांवर दमदार परफॉर्मन्स सादर केला. दोघीनांही स्पर्धकांचे सगळेच परफॉर्मन्स आवडले आणि त्यातील काही परफॉर्मन्स खूपच मोहक असल्याचे सांगतानाच आशा पारेख यांनी कबुली दिली की, ‘संजय लीला भन्सालीचे सर्वच चित्रपट खूप आवडतात. त्याचे चित्रपट भव्य असतात आणि ते पाहताना नेत्रसुख मिळते. ते भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतात आणि ते वास्तविकतेला धरून असतात. पद्मावत, बाजीराव मस्तानी सारखे चित्रपट त्यांना खूप आवडले असल्याचे सांगतानाच त्या म्हणाल्या की , संजय लीला भन्सालीच्या चित्रपटांची त्या आतुरतेने वाट पाहात असतात. ‘

त्यांच्या काळातील नृत्याविषयी बोलताना अशा पारेख म्हणाल्या की , ‘शम्मी कपूर आणि शशी कपूर हे त्यांच्या काळातील सर्वात चांगले नर्तक होते. तसेच रणबीर, करिना, करिश्मा कपूर या कपूर कुटुंबातील सर्वांच्याच शरीरामध्ये संगीत आणि लय भिनलेली आहे.’

आशा पारेख यांनी १९६० ते १९८० या काळात हिंदी चित्रपटसृष्टीचा काळ गाजवलेला आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी नृत्याचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. १९९२ साली तिला भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब बहाल केला. १९९४ ते २००० ह्या काळात त्या भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा होत्या.