प्रलंबित विविध मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – आशा सेविकांच्या वतीने प्रलंबित विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरात कल्याण भवन जवळ एकत्र येत आशा स्वयंसेविकांनी कल्याण भवन, शिवतिर्थ, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय समोरील रस्ता, जेल रोड मार्गाने क्युमाईन क्लब मोर्चाने येत जुन्या प्रलंबित मागणीसाठी पावसात डोक्यावर छत्री घेत मागण्या आमच्या हक्काच्या, आम्हाला न्याय दिलाच पाहिजे, अशा जाेरदार घोषणा दिल्या. शासनाचा निषेध केला.

एकत्र जमलेल्या आशा स्वयंसेविकांना उपाध्यक्ष युवराज बैसाणे यांनी मार्गदर्शन करतेवेळी सांगितले की, राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत सुमारे 60 हजार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना दरमहा 1500 रुपये मानधन व्यतिरिक्त कामावर आधारीत मोबदला तसेच गट प्रवर्तकांना प्रवास भत्ता दरमहा 8725 रुपये अदा करण्यात येतात. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना त्यांच्या कामाचे त्यांच्या कामाचे महत्त्व व गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवून वेतन व भत्ते लागू करावेत.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेपर्यंत त्यांना कमीतकमी किमान वेतन तरी विनाविलंब लागू करावे. वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या, चर्चा विफल ठरल्या. शासनाने मागण्या आचारसंहिते अगोदर मान्य कराव्या या करिता शासनाचा निषेध करण्यात आला. मोठ्या संख्येने मोर्चात आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना आशा सेविकांच्या मागण्या त्वरीत मान्य व्हाव्यात या करीता निवेदन देण्यात आले.

 

You might also like