माऊलींंच्या पादुका पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्हा मार्गे पंढरीकडे मार्गस्थ

नीरा :  पोलीसनामा ऑनलाइन –   माऊलीनामाचा गजर करीत संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका लालपरीने पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्हा मार्गे तर संत सोपानकाकांच्या पादुका नीरा, बारामती मार्गे मंगळवारी (दि.३०) कडेकोट बंदोबस्तात पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. मात्र, शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान न घातल्याने भाविकांमध्ये नाराजी दिसत होती.

कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा पायी वारी रद्द करण्यात आल्यामुळे माऊलींच्या पादुका लालपरीने
मंगळवारी ( दि.३०) दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यातील पाडेगांव (ता.खंडाळा) येथे प्रवेश करून पुढे पंढरी कडे मार्गस्थ झाल्या.

यादरम्यान नीरा (ता.पुरंदर ) येथून माऊलींच्या पादुका मार्गस्थ होताना नागरिकांनी जागोजागी लालपरीवर पुष्पवृष्टी करून माऊली…..माऊलींचा जयघोष केला. तर मंगळवारी (दि.३०) माऊलींच्या पादुका नीरा येथून मार्गस्थ होणार असल्याने माऊलींचे नीरा स्नान होईल या आशेने काही भाविक दत्तघाटाकडे डोळे लावून बसले होते. मात्र माऊलींच्या पादुका घेऊन जाणा-या लालपरीने नीरा नदीच्या मोठ्या पुलावरून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला तेंव्हा नीरा, पाडेगांव येथील भाविकांना आपल्या चेहऱ्यावरील नाराजी लपविता आली नाही.

दरवर्षी माऊलींचा सातारा जिल्ह्यात प्रवेश होताना माऊलींच्या पादुकांना नीरा नदीकाठावरील प्रसिद्ध दत्तघाटावर नीरा नदीतील पवित्र तीर्थाने स्नान घातले जाते. मात्र यंदा कोरोणामुळे पायी वारी सोहळा रद्द झाल्याने माऊलींच्या नीरा स्नानाची शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने दत्तघाट सुना…. सुना दिसत होता.

तसेच सासवडहून निघालेल्या श्री. संत सोपानकाकांच्या पादुका नीरा ( ता.पुरंदर) येथून दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी बारामती मार्गे पंढरपुर कडे मार्गस्थ झाल्या.

माऊलींच्या पादुका पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात मार्गस्थ होत असताना भोर-पुरंदरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने
यांनी बंदोबस्त फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी खंडाळाचे तहसीलदार दशरथ काळे उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like