‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ ! वारकरी सांप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार का हा सर्वात मोठा प्रश्न वारकरी सांप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला होता. आषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आज (शुक्रवार) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींची पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली. यावेळी आळंदी आणि देहुवरून निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली.

कोरोना संकटामुळे मागील काही दिवसांपासून आषाढी वारीचे काय होणार ? हा प्रश्न वारकऱ्यांसह सर्व भाविकांना पडला होता. यावर अखेर आज निर्णय घेण्यात आला आहे. आळंदी आणि देहुच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहेत. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरवले जाईल. देहु आणि आळंदी पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाल्याने यांदाची पायी दिंडी सोहळा होणार नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतच्या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची, आळंदी आणि देहु पादुका पंढरपूरला कशा प्रकारे न्यायच्या याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहु आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. यावेळी वारकऱ्यांचे प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भुमिका उपमुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. त्यानंतर दोन्ही ठिकाणच्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मंडण्यात आली.

यापूर्वीच आषाढी वारीसाठी राज्यातील सात मानाच्या पालखी सोहळ्यापैकी एकनाथ महाराज पैठण, निवृत्तीनाथ महाराज त्रम्बकेश्वर, मुक्ताबाई, मुक्ताईनगर जळगाव आणि सोपान काका सासवड यांनी यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like