शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे ; आशिष शेलारांचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे” अशा शब्दात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. मनसेला रामराम ठोकलेले एकमेव आमदार शरद सोनावणेंवरुनही शेलारांनी टोला हाणला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की, ‘सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही.. जाणत्‍या राजाला गाठले.. पाठीवर हात ठेऊन.. नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन..  बारामतीच्‍या काकांनी “फक्त लढ” असे म्‍हटले.!! “शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे”.

 

राज ठाकरेंनी वर्धापन दिनी जे भाषण केलं होतं त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. राज ठाकरेंना फडणवीस ‘बारामतीचा पोपट’ म्हणाले होते. त्यानंतर राज ठाकरेंनीही फडणवीसांवर पलटवार केला होता. ‘देवेंद्र फडणवीस हे म्हणजे हवा गेलेला फुगा आहे. फुगलेल्या फुग्याला जसा कोणताही आकार दिला जातो तशी अवस्था देवेंद्र फडणवीस यांची आहे’, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.