‘लटकवणे, अडकवणे, भटकवणे असा ठाकरे सरकारचा कारभार’ : आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लटकवणे, अडकवणे, भटकवणे असा ठाकरे सरकारचा कारभार आहे, असा घणाघात आरोप करत भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मेट्रोच्या कारशेडवरून केंद्र सरकारविरुद्ध राज्य सरकार आमनेसामने आलं आहे. मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा मोदी सरकरानं केला आहे. यानंतर आता आशिष शेलार यांनीही यावर भाष्य करत निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनीसोबत ते बोलत होते.

आशिष शेलार म्हणाले, “मुख्यमंत्री महोदयांनी आरेऐवजी कांजूरला मेट्रो कारशेड नेण्याचा निर्णय केला. त्याच वेळेला आम्ही म्हटलं होतं, राज्य सरकारचा यामागे कुहेतू दिसतोय, घोषणा झाली तेव्हाच प्रतिक्रिया देताना आम्ही स्पष्ट म्हटलं होतं. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यामुळं मुंबईकरांना त्रास होतोय. आज ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत. त्यावेळेला सुद्धा सांगताना आम्ही म्हटलं होतं. मीठागर आयुक्त सॉल्ट कमिशनरची परवानगी जागा नावावर करताना घेतली होती का” असा सवालही त्यांनी केला आहे.

पुढं बोलताना ते म्हणाले, “आज केंद्राच्या पत्रानं एक गोष्टी स्पष्ट झाली आहे. अहंकारी प्रवृत्तीनं घेतलेल्या निर्णयामुळं मुंबईकरांना त्याच्या दुष्परिणामांचा सामाना करावा लागत आहे. मेट्रोच्या विकासात महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे. पहिल्यांदा लटकवणे, अडकवणे, जागा ट्रान्सफर करताना ज्या पद्धतीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होती ती केलेली दिसत नाही. मीठागर आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही. अडकवणे, जनतेला भटकवणे आणि चुकीची माहिती देऊन भ्रमित करणे असा त्यांनी निर्णय घेतला आहे.”

शेलार असंही म्हणाले, “मेट्रोच्या प्रकल्पात माननीय उद्धव ठाकरेजींनी (CM Uddhav Thackeray) घेतलेला निर्णय हा लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे अशा पद्धतीचा कारभार आहे. मुंबईकरांच्या माथी दिरंगाई तुम्ही थोपवली आहे. यात राज्य सरकार सर्वस्वी दोषी असल्याचा” आरोपही त्यांनी केला आहे.