भाजप आमदार आशिष शेलार यांचे CM ठाकरे, आदित्य ठाकरेंवर टिकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरून आता जोरदार राजकारण सुरू आहे. कांजूरमार्गच्या जागेचा निर्णय घेतला तेव्हाच भविष्यातील जागा हस्तांतरातील 50 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी करताय ? असा सवाल त्या वेळी आम्ही केला होता. तेच खरे आता खरे ठरत आहे. पेटवायची अस्मिता, खायची मालमत्ता? मुंबईकर हो, अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे हे पाहा “मेट्रो कारनामे !” अशा शब्दांत भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) आणि आदित्य ठाकरे यांच्यावर (Environment Minister Aditya Thackeray) टीकास्त्र डागले आहे. आमदार शेलार यांच्या टीकेला आता शिवसेनेकडून कोण आणि कशाप्रकारे उत्तर देणार, हे पाहावे लागणार आहे.

कांजूरमार्गच्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाची जागा ( Kanjurmarg metro car shed) केंद्राची असल्याचा दावा केला होता. तर राज्य सरकारकडून ही जागा आपल्याच मालकीची असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे.

गारोडिया समूहाचे महेशकुमार गरोडिया यांनी एमएमआरडीएला नोटीस बजावली. कांजूर खेड्यातील 500 एकर जागेची आपण भाडेपट्टी केली आहे. त्यामुळे काम थांबवा. तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मेट्रो कारशेडसाठी दिलेल्या 100 एकर जमिनीचा आदेश मागे घ्या, अशी नोटीस बजावली आहे.
‘मुंबई सीटी सिव्हिल कोर्टाने 16 एप्रिल 2016 ला या जागेबाबत जैसे थे परिस्थिती ठेवा असे आदेश दिले, असा दावाही गारोडीया यांनी केलाय. इंच इंच जमीन महाराष्ट्राची, असे सांगणारे आता गारोडीयाच्या सातबारा आडून भूखंडाचा श्रीखंड, तर खाणार नाही ना ? भूसंपादनच्या नोटीसची वाट तर बघत नाही ना ?, असा सवाल शेलार यांनी ट्विटरद्वारे विचारला आहे.

वाढीव वीजबिलावरूनही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

महाविकास आघाडीच्या सरकारने पुन्हा एकदा राज्यातील वीज ग्राहकांना, सामान्य नागरिकांना ‘जोर का झटका धीरे से’ अशा पद्धतीने वीजबिलचा शॉक दिला आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आता तुम्हीच राज्याला उत्तर द्या, असं थेट आव्हान आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.