पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंना घाबरून पळाले : आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे आता उदयनराजे भोसले विरूद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत रंगणार आहे. यावरून भाजपचे शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले आहेत की , ‘ साताऱ्यात उदयनराजेंविरोधात उभे राहण्याची हिंमत पृथ्वीराज यांना झाली नाही व ते घाबरून पळाले. उदयनराजे छत्रपतींचे वंशज तुम्ही विरोधकांना पराभवाचे पाणी पाजा! सातरच्या गादीसमोर काँग्रेसचे “पृथ्वीअस्त्र” भयभीत होऊन पळाले.. भाजपचे विरोधक सारे गारद झाले. दिल्ली.. अमेरिकेच्या तख्तापर्यंत गरजतात सारे!गरजा महाराष्ट्र माझा! असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रिक्त जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीत उदयनराजे यांच्या विरोधात सक्षम आणि दमदार उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आग्रही होते तसेच सोनिया गांधी यादेखील चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल होत्या.मात्र काल रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांनी श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे आता उदयनराजे भोसले विरूद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत रंगणार आहे. तर काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत कऱ्हाड दक्षिणमधून विधानसभेची उमेदवारी दिली आहे.

 

Visit : Policenama.com