महाविकास आघाडी सरकार पळपुटे आणि पराधीन, आशिष शेलार यांची टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महाविकास आघाडीचे सरकार हे ‘पळपुटे’ आणि ‘ पराधीन’ आहे. जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. मुख्यमंत्र्यांना फक्त ‘बॉलिवूड’ची तर त्यांच्या चिरंजीवांना फक्त ‘बार’ची चिंता असल्याची जोरदार टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. परंतु त्याचवेळी शाळा सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्री म्हणून काय निर्णय घेतला असता, याबाबत मात्र सर्व घटकांशी
‘ चर्चा ‘ केली असती, असे स्पष्टीकरण शेलार यांनी दिले.

भाजपचे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी शेलार यांनी महाआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. याप्रसंगी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, दत्ता खाडे, राजेश येनपुरे आदी उपस्थित होते.

शेलार म्हणाले की, ठाकरे सरकारने राज्याची दयनीय अवस्था केली. पळपुटे आणि पराधीन सरकार आहे, याचा निषेध करतो. जनतेच्या प्रश्नांवर पळ काढतात. विद्यार्थी फी वाढ केली. पालकांनी विचारणा केली, तर कोर्टात जायला सांगतात. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, मदतीसाठी कायम केंद्राकडे बोट दाखवतात, मराठा आरक्षण संरक्षित करण्याचे काम फडणवीस सरकारने केले. परंतु ते टिकवून ठेवण्यासाठी वकिलांनाही कोर्टात उपस्थित केले नाही. अंतिम वर्ष परीक्षाबाबतच निर्णय तसेच, बदल्याचा विषय काढला की एजंटकडे बोट दाखवतात. मुख्यमंत्री बॉलिवूडची अधिक चिंता करतात, तर चिरंजीव बार आणि पबची चिंता करतात, असा टोला शेलार यांनी लगावला.

कोरोनाचा संसर्ग हाताळण्यात राज्य सरकारने गोंधळ केला. पुण्यातील रुग्ण व मृतांची आकडेवारीही लपवण्यात आली, असा आरोप आशिष शेलार यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला. यावर महापालिकेत भाजपचीच सत्ता आहे, हे लक्षात आणून दिल्यावर शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी स्पष्टीकरण केले. कोरोनामध्ये पुणे महापालिकेने चांगले काम केले. राज्य शासनाची अपेक्षित मदत नसताना 300 कोटी रुपये खर्च केल्याचे मुळीक यांनी निदर्शनास आणून दिले.