दुर्देवी चित्र.. ‘महाराष्ट्र’ नगरी आणि चौपट राजा !, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर ‘घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात बार, दारूची दुकानं सुरू झाले पण अद्यापही मंदिरं सुरू करण्यात आली नाही त्यामुळे राज्य सरकारवर चौफेर टीका करण्यात येत आहे. यावरून आता भाजप नेते आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे. प्राचीन दंतकथेतील आटपाट नगरीच्या कथेचा आधार घेत आशिष शेलार यांच्याकडून ठाकरे सरकारवर बोचरी टीका करण्यात आली.

”आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट… महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोनासोबत पावसाने थैमान घातलेले… शेती, घरे, गुरे सारे काही उद्ध्वस्त झालेले… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर अनावर… तेव्हा नगराचे राजे ‘बॉलिवूड’ कसे वाचवायचे यावर चिंतातूर झालेले… मदतीसाठी राजा येतच नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता आता मंदिरे तरी उघडा असा अर्जव करतेय… त्यावेळी नगरात कुणीही मागणी केलेली नसताना पब, बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून ‘नाईट लाइफ’ची काळजी राजपुत्र करत आहेत…दुर्देवी चित्रं… ‘महाराष्ट्र नगरी आणि चौपट राजा’..,” असे ट्विट करत आशिष शेलार यांनी राज्यसरकारच्या कारभाराचे धिंडवडे काढले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून मंदिरे सुरु करण्याची मागणी केली जात आहे. भाजप, एमआयएम, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसह धार्मिक संघटनांकडून मंदिरं उघडण्याची मागणी केली जात होती. भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि धार्मिक संघटनांनी तर या विषयावर आंदोलनेसुद्धा केली होती. मात्र, तरीही सरकारने या मागण्यांकडे पूर्णपणे कानाडोळा केल्याने त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून राज्यातील मंदिरं सुरू करण्याची सूचना करण्यात आली होती. यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही पत्राद्वारे आम्हाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचं राज्यपालांना सांगितलं होतं.

या लेटर वॉरवरून शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. परिणामी मंदिर सुरू करणे हा मुद्दा बाजूला राहुन हिंदुत्वावरून दोन्ही पक्षात जुंपली होती असे चित्र निर्माण झाले होते. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून पुन्हा अनलॉकची नियमावली जाहीर करण्यात आली. त्यातसुद्धा मंदिरे सुरु करण्याचा उल्लेख नव्हता. त्याउलट काल मुख्यमंत्र्यांनी सिनेउद्योगाशी निगडीत काही लोकांशी काल संवाद साधला होता. यामध्ये त्यांच्याकडून बॉलिवूड इतरत्र हलविण्याचा किंवा बॉलिवूडला संपविण्याचा काही लोकांचा डाव असून हा डाव हाणून पाडणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. याच मुद्द्यावरून आशिष शेलार यांनी टीका केली आहे.