…तेंव्हा आशिष शेलार झोपले होते का ? शरद पवारांवरील आरोपांवर राष्ट्रवादीचे चोख प्रत्यूत्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात कसली आलीय देशभक्ती. हे शरद पवारांच्या देशभक्तीच्या व्याख्येत बसते का? असा सवाल करत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केली होती. यावर आता राष्ट्रवादी कॉग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी शरद पवार यांनी मंगळवारी केलेल्या लाईव्ह व्हिडीओची लिंक शेअर केली आहे. जेंव्हा शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा शेलार तुम्ही झोपले होते का? असा सवाल केला आहे. गुड मॉर्निंग आशिष शेलार, झोपेतून उठा आणि ही लिंक चेक करा, असे ट्विट करून शेलारांनाही टॅग केले आहे.

राजकीय सुडापोटी देशात अराजकता पसरवू नका असे म्हणतानाच शरद पवारांकडून माथी भडकविण्याचे काम अपेक्षित नसल्याचे आशिष शेलार म्हणाले होते. तसेच राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दिल्लीतील आंदोलनाच्या हिंसेचे समर्थन करत आहेत. ज्यांनी आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात चकार शब्दही काढला जात नाही. उलट महाविकास आघाडीतील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केल जातयं. कुठे फेडणार ही पापं? अशी टिका शेलार यांनी केली होती. त्याला राष्ट्रवादीने जशास तसे उत्तर दिले आहे.

शरद पवार काय म्हणाले होते….

दिल्लीमध्ये मंगळवारी घडलेल्या घटनेचे समर्थन करता येणार नाही. मात्र या घटनेच्या मागील कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. केंद्र सरकारने आपल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे निभावल्या नाहीत. केंद्राने परिपक्वपणे आणि योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता होती, असे शरद पवार म्हणाले. शेतकऱ्यांना न दुखावता सरकारने सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे. बळाचा वापर करून काहीही सिद्ध होणार नाही. केंद्र सरकारने कृषी कायदे लागू करताना सविस्तर चर्चा करायला हवी होती, असे ते म्हणाले.

दरम्यान आंदोलनाला खलिस्तानशी जोडणे चुकीचे ठरेल. केंद्राने टोकाची भूमिका सोडून शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक सरकारने करू नये, असे आवाहन पवार यांनी केले आहे.