अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर राजकारण तापलं, बाळासाहेब थोरात म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आमचं क्षेत्र असो वा सिनेमा, नाट्य क्षेत्रा सारखच असतं. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे, या अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर आमचा सिनेमा हा मल्टिस्टार सिनेमा असून तो यशस्वी होणार, असे थोरात यांनी म्हटलंय. तसेच आम्ही पाच वर्षे आनंदाने काम करू असे स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.

आमचं क्षेत्र असो वा सिनेमा, नाट्य क्षेत्रा सारखच असतं. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे. आम्ही तीन पक्ष एकत्र येऊ असे वाटले नव्हते. पण आम्ही एकत्र आलो. सध्या मल्टिस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजेतच. त्यामुळे आमच सरकार आलं असे विधान अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे केले होते. त्यावर बोलताना थोरात म्हणाले, चव्हाण काय म्हणाले माहित नाही, पण सरकार पाच वर्षे चालेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
संविधानाच्या चौकटीतच सरकार चालते, ते सगळ्यांना बंधनकारक आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि संविधानाची बांधिलकी आहे, तसेच आम्ही काम करू. देशात संविधानाला धक्का लावण्याचे काम सुरु असल्याचे थोरात यांनी यावेळी सांगितले. तसेच अशोक चव्हाण यांनी नेमके काय विधान केले हे आपल्याला माहिती नाही. पण आमचे सरकार पाच वर्षे टिकणार, आम्ही एकत्र काम करणार, हा मल्टिस्टार सिनेमा यशस्वी होणार असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने फटकारले…
अशोक चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक चव्हाण यांचे म्हणणं फेटाळून लावलं. शिवसेनेने काँग्रेसला काहीही लिहून दिलेलं नाही असे शिंदे यांनी सांगितले. सरकार हे राज्यघटनेने सांगितलेल्या तत्वांप्रमाणेच काम करत असते त्यामुळे काहीही लिहून देण्याचा प्रश्नच नाही, असे शिंदे यांनी सांगितले.