सरकार मला चक्रव्यूहात अडकवतंय, राजकीयदृष्ट्या संपवतंय

'या' माजी मुख्यमंत्र्याची खदखद

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे मतदारांनी मतदान करताना विचार करा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी केले आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे. दोन्ही सरकार जाणीवपूर्वक काँग्रेस असलेल्या ठिकाणची विकास काम रोखत आहेत. सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी तुमचा आहे आणि तुमचाच राहणार, तुमच्यातच मरणार अशी भावनिक साद त्यांनी मतदारांना घातली. भोकरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते.

पक्षातील एखादा कार्यकर्ता चुकीचं वागत असेल, तर मी निवडणुकीनंतर त्यांना शिक्षा करेन, पण तुम्ही वड्याचे तेल वांग्यावर काढू नका. त्यांच्यावरील रागाची शिक्षा मला देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण निवडणूक लढवण्यास उत्सुक नव्हते. मात्र प्रदेशाध्यक्षांनीच निवडणूक लढवली नाही तर चुकीचा संदेश जाईन यामुळे त्यांना निवडणूक लढवण्याचे आदेश हायकमांडने दिले होते. मागील निवडणुकीत काँग्रेसचे दोन खासदार निवडून आले होते. त्यामध्ये अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून विजय मिळवला होता. त्यांना यावेळी पुन्हा संधी देण्यात आली आहे.