राहुल गांधींनी पक्षाचं नेतृत्व करावे : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसच्या नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही याबाबत भूमिका माडंली असून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व करावे असे मत मांडले आहे.

राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारवे या निवेदनाचे एक पत्र चव्हाण यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, ‘पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. पक्षाच्या अध्यक्ष पदासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती निर्णय घेईल. परंतु, खा. राहुलजी गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारावे, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. ते सक्षम, संयमी व संवेदनशील नेते असल्याचे ट्वीट चव्हाण यांनी केले आहे. दरम्यान, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली, भूपिंदर हुड्डा, आनंद शर्मा, कपिल सिबल, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, शशी थरूर या 23 काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. पत्रात सोनिया किंवा राहुल गांधी यांच्यावर प्रत्यक्ष टिप्पणी करण्यात आलेली नाही, मात्र जनतेशी संपर्कात राहणार्‍या सक्रिय नेतृत्वाची पक्षाला गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे.