पराभवानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदार संघात काँग्रेसची जागा येणारच असे मानले जात होते मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांची जागा राखण्यास अपयशी ठरले आहेत. नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. जनतेने दिलेला निकाल तर स्विकारावाच लागणार आहे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, आता विधानसभेच्या तयारीला लागायचे आहे असे चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच या निकालानंतर तुम्ही राजीनामा देणार अशी चर्चा आहे याबाबत विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले अजून पूर्णपणे निकाल हाती आला नाही. राजीनाम्याबाबत बोलायचे तर पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे अशोक चव्हाण म्हणाले. मला कधीच पदाचा हव्यास नव्हता असे देखील ते म्हणाले.

अशोक पर्व’ संपले ; नांदेडमधून भाजपचे प्रताप चिखलीकर विजयी
नांदेड मतदार संघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांची जागा राखण्यास अपयशी ठरले आहेत. भाजपचे प्रताप चिखलीकर ४१,२८३ मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रताप चिखलीकर यांच्यात थेट झालेल्या लढतीत वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगेंमुळे चांगलीच चुरस निर्माण झाली होती. भाजपच्या प्रताप चिखलीकर यांना ४,०८,९७७ मते पडली तर काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना ३,६७,६९४ मते पडली.

नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार १७ लाख १७ हजार ८३० मतदार आहेत. त्यापैकी एकूण ११ लाख १९ हजार ११६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदार संघात ६५.१५ % टक्के मतदान झाले.

नांदेड या मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ येतात. नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या केवळ दोन जागा निवडून आल्या होत्या. त्या दोन जागांपैकी नांदेड लोकसभेची जागा मोदी लाटेत निवडून आणण्यास अशोक चव्हाण यशस्वी ठरले होते. वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशामुळे यावेळेस अशोक चव्हाण निवडून येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक लढण्यास इच्छुक नसताना देखील अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक लढवली होती. २००४ चा अपवाद वगळता भारतीय जनता पक्ष एकदाही येथून निवडून यऊ शकलेला नाही. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत दिगंबर पाटील येथून निवडून आले होते.

You might also like