‘अशोक चव्हाणांची आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. या उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांची हाकालपट्टी करण्याची मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. ही मागणी करून खासदार संभाजीराजे यांनी अशोक चव्हाण यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला आहे.

आझाद मैदानावर मराठा तरुणांनी उपोषण सरु केले आहे. या उपोषणाचा आजचा 36 वा दिवस असून आज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा तरुणांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्याची मागणी केली. तसेच मराठा आरक्षणावरून त्यांनी सरकारवर टीका देखील केली. मागील 36 दिवसांपासून हे तरुण उपोषण करत आहेत. उद्या त्यांचं बरं वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असे सांगताना या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आज दुपारी दोन वाजता मंत्रालयात बैठक होती. मात्र दोन वाजता लक्षवेधी असल्याने ही बैठक पाच वाजता होणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. सारथीच्या मुद्यावर बोलताना माझा अवमान कोणीही करू शकणार नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात जन्माला आलो त्याचा मला अभिमानच आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सारथी संदर्भात मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.