संविधान वाचले तरच हा देश वाचेल : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणावे लागणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असं आवाहन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार संविधानाला पायदळी तुडवून हुकुमशाही पद्धतीने देशाचा कारभार करत आहे. संविधानिक संस्था मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सत्ताधारी पक्षाकडून सामाजिक वातावरण गढूळ करून राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. दलित, अल्पसंख्यांकांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले असून संविधान वाचले तरच हा देश वाचेल, असं सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

दरम्यान, भाजपच्या काळात संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने या लोकविरोधी भाजप शिवसेना सरकारविरुद्ध जनसंघर्ष सुरु केला आहे. राज्यभरात साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून काल भिवंडी येथे जनसंघर्ष यात्रेचा समारोप झाला पण संघर्ष थांबवलेला नाही. केंद्रातील आणि राज्यातील खोटारडे, हुकुमशाही वृत्तीचे सरकार घालवल्याशिवाय तो थांबणार नाही, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.