‘…म्हणून स्त्रीचा शाप महागात पडतो’, अशोक पंडितांचा संजय राऊतांना टोला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी बीएमसीने कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई केली. घटनेनंतर अनेकांनी बीएमसीवर टीका करत कंगनाला पाठिंबा दिला आहे. त्यामध्येच अशोक पंडित हेदेखील व्यक्त झाले असून त्यांनी कंगनाची पाठराखण केली आहे. त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ‘एका स्त्रीने दिलेला शाप महागात पडतो’, असे म्हटले आहे.

एक स्वप्न उद्धवस्त झाले. देव तिला आणखी बळ आणि शक्ती देवो. एका स्त्रीचा शाप महागात पडतो संजय राऊतजी, असे ट्विट अशोक पंडित यांनी केले आहे. ट्विटनंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर काहींनी त्यांना पाठिंबादेखील दिला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगना सातत्याने तिचे मत मांडत आहे. यामध्येच तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागले होते. खासदार संजय राऊत यांनीदेखील कंगनावर कठोर टीका केली होती. तेव्हापासून कंगना आणि संजय राऊत यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे.