राधाकृष्ण विखे पाटलांच्या भावाचा आणखी एक गौप्यस्फोट

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा मेडिकल ट्रस्टला एका दहशतवाद्याने दोन कोटी रुपये डोनेशन दिल्याचा गौप्यस्फोट अशोक विखे यांनी केला होता. भावानेच आरोप केल्याने खळबळ उडाली होती. अशोक विखे यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. कुटुंबात मोठा भाऊ असुनही वडिलांना अग्नी देऊ दिला नाही, असा आरोप राधाकृष्ण विखे यांच्यावर केला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी झालेल्या सभेत अशोक विखे यांनी गौप्यस्फोट केला. अशोक विखे यांनी नगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली नाही, याबद्दलही त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले. मोठ्या भावालाही ज्यांनी सोडले नाही, ते लोकांना काय सोडणार ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यांच्यासमोरच अशोक विखे यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे हे निवडणूक लढवित आहेत. त्यांचे काका तथा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांना राष्ट्रवादीने व्यासपीठावर बोलावून एकच खळबळ उडवून दिली आहे.