पोलीस अधिकारी खून प्रकरण : ‘त्या’ २ जणांचा जामीन अर्ज फेटाळला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेले सहआरोपी महेश फळणीकर व कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज अलिबाग जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपींच्या वकिलांनी जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी पुढील तारीख मागितली होती; पण न्यायालयाने मुदत देण्यास थेट नकार देऊन जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रे यांच्या वस्तूंची खासगी लॅबकडून तपासणी करून घेऊ नये, असा अर्ज केला होता. तोही न्यायालयाने फेटाळला.

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणी अलिबाग जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायायाधीश आर. जी. मलशेट्टी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. फळणीकर व कुंदन भंडारी यांचा जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर युक्तिवाद करण्यास पुढील तारीख मिळावी, अशी विनंती संशयितांच्या वकिलांनी न्यायालयास केली होती; पण न्यायालयाने मुदत देण्यास नकार दिला आणि अर्ज फेटाळला. अश्विनीचे पती राजू गोरे यांनी अश्विनी यांच्या वस्तूंची डीएनए टेस्ट खासगी लॅबकडून करून घ्यावी, अशी मागणी केली होती.

त्याप्रमाणे पनवेल न्यायालयाने त्या वस्तू खासगी ट्रथ या लॅबकडे वर्ग केल्या आहेत. त्याची टेस्ट खासगी लॅबकडून करून घेऊ नये, असा अर्ज मुख्यआरोपी अभय कुरुंदकर याने वकिलामार्फत सत्र न्यायालयात दाखल केला होता. तो अर्जही न्यायाधीश मलशेट्टी यांनी फेटाळला. त्याच बरोबर पनवेल न्यायालयाचा खासगी ट्रथ लॅबमध्ये डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. आरोपीने कारागृह बदलाच्या केलेल्या मागणीवरही सुनावणी झाली असून त्याबाबत अंतिम निर्णय २ जानेवारी, २०१९ रोजी होणार आहे.