home page top 1

२५ हजारांची लाच स्विकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – अवैध वाळू वाहतुक केल्याप्रकऱणी कारवाई टाळण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचा रायटर असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या चालकाला  अ‍ॅन्टी करप्शन पथकाने रंगेहात पकडले.

हरिश्चंद्र ब्रम्हानोटे असे सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर राजू अवझे असे त्याच्या चालकाचे नाव आहे.

तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे ट्रॅक्टर असून त्यातून अधून मधून ते रेती वाहतुक करतात.  सहायक पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र ब्रम्हानोटे हा  उपविभागीय पोलीस अधिकारी नयन आलूरकर यांचा रायटर आहे. त्याने  तक्रारदार यांना कारवाईची धमकी दिली. ती टाळण्यासाठी पैशांची मागणी केली. त्याने त्यांच्यावर दबाव टाकत कारवाई टाळण्यासाठी ३२ हजार ५०० रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती २५ हजारांवर तो तयार झाला.

मात्र तक्रारदार यांना पैसे द्यायचे नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार केली. त्याची पडताळणी केल्यावर त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी दुपारी सापळा रचण्यात आला. त्यावेळी रामटेक येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात ब्रम्हानोटे व त्याचा वाहनचालक राजू अवझे यांना लाच स्विकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाकडून  रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर रामटेक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अन्टी करप्शनचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, उपअधिक्षक  विजय माहूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर शेळके, कर्मचारी प्रविण पडोळे, लक्ष्मण परतेती, सरोज बुधे, परसराम साई यांच्या पथकाने केली.

Loading...
You might also like