सहायक फौजदाराची आत्महत्या, शहरात एकच खळबळ

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलीस ठाण्याच्या डीबी रुममध्ये सहायक फौजदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजू उईके असे या सहायक फौजदाराचे नाव आहे. राजू उईके यांनी पोलिसांच्या युनिफॉर्मवरच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

राजू हे यवतमाळ जवळच्या वाघापूर येथील रहिवासी होते. राजू यांची रात्रपाळी होती. रात्री एक वाजेपर्यंत ते ड्युटीवरच होते. दरम्यान, इतर कर्मचारी रात्री उशिरा घरी निघून गेले. त्यानंतर त्यांनी डी बी रुममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी घटनास्थळी दाखल झाल्या.

राजू यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, जात वैधता प्रमाणपत्रामुळे ते गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यांनी ही अस्वस्था आपल्याबरोबरील पोलीस कर्मचार्‍यांशी बोलून दाखविली होती.