बांगलादेश : रोहिंग्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये लागली आग, 15 लोकांचा मृत्यू

ढाका : बांगलादेशातील कॉक्स बाजार जिल्ह्यात रोहिंग्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये आग लागल्याने किमान 15 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक लोक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर किमान 400 रोहिंग्या निर्वासित बेपत्तासुद्धा आहेत. फायर सर्व्हिस आणि सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंटचे जिल्हा प्रमुख मोहम्मद अब्दुल्ला यांनी मंगळवारी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी रात्रभरात आग विझवली. तर, युएनएचसीआरच्या जोहान्स वान डर क्लाव्ह यांनी म्हटले या घटनेत किमान 15 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 400 पेक्षा जास्त बेपत्ता आहेत.

17 हजारपेक्षा जास्त छावण्या जळून खाक
फायर सर्व्हिस आणि सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंटचे जिल्हा प्रमुख मोहम्मद अब्दुल्ला यांनी म्हटले की, विविध एजन्सीजद्वारे संचालित उपचार केंद्रांमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत आणि सरकार नुकसानीची माहिती घेत आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. निर्वासित दिलासा आणि पुनर्वसन आयोगाचे उपप्रमुख मोहम्मद शमसुद दौजा यांच्यानुसार, सोमवारी दुपारी एका छावणीत आग लागली आणि जवळपासच्या चार इतर छावण्यांमध्ये पसरली. यामुळे हजारो रोहिंग्या मुसलमान बेघर झाले. एका अंदाजानुसार, 17 हजारपेक्षा जास्त छावण्या आगीत जळून खाक झाल्या.

560 रोहिंग्या जखमी, 45 हजार विस्थापित
संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सीने एका वक्तव्यात म्हटले की, आगीने निवास, आरोग्य केंद्र, वितरण व्यवस्था आणि अन्य सुविधांना प्रभावित केले आहे. या घटनेत 560 लोक जखमी झाले आहेत आणि 45 हजार निर्वासित विस्थापित झाले आहेत. या घटनेची भीषणात यावरून समजू शकते की, अनेक मुले आपल्या कुटुंबाच्या शोधात जोर-जोरात रडत होती आणि सैरावैरा धावत होती. म्यानमारमधून पलायन केल्यानंतर 10 लाखांपेक्षा जास्त रोहिंग्या मुसलमान कॉक्स बाजारात 3,000 हेक्टरपेक्षा जास्त डोंगराळ जागेत बनवलेल्या 34 छावण्यांमध्ये राहात आहेत.