न्याय मांगो, होगी जेल : भुजबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सध्याचे सरकार हुकूमशाही वृत्तीचे आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवले जाते. ‘न्याय मांगो, होगी जेल’ अशी परिस्थिती या सरकारच्या काळात आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन निधन यात्रा आज नगर दौऱ्यावर आहे. कर्जत व पारनेर येथे झालेल्या सभांमध्ये भुजबळ यांनी भाजपप्रणीत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, हे सरकार गाडल्याशिवाय हा भुजबळ गप्प बसणार नाही. राज्यामध्ये सर्वत्र अराजकता पसरली आहे. नोटाबंदीनंतर सर्व काळा पैसा गुजरातमधील पतसंस्थामधून पांढरा करण्यात आला आहे. यात अमित शहा यांचाही समावेश आहे. आज देशावर 82 लाख कोटीचे कर्ज झाले आहे. पंतप्रधानानी हा देश विक्रीस काढला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

राम मंदीर हे फक्त सत्ता मिळविण्याचा मार्ग आहे. यामुळे जनतेने आता सावध होण्याची गरज आहे, असेही भुजबळ म्हणाले.

मी सोडून इतरांच्या हत्या केल्या: पाटील
भाजपचे सरकार हे ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर आले आहे. ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करणारे देशात सुरूवातीला 13 ते 14 जण होते. त्यातील मी एकटा जिवंत आहे. इतरांच्या हत्या करण्यात आल्या आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केला आहे.

मोदींचा गजनी झाला : मुंडे
ज्याप्रमाणे गजनी चित्रपटात पूर्वार्धात नायक जे बोलतो, ते चित्रपटाच्या उत्तरार्धात त्याला आठवत नाही. तशीच परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झाली आहे. निवडणूक प्रचारात ते काय बोलले. त्यांना ते आता आठवत नाही. त्यांचा गजनी झाला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.