शासकीय कार्यालयात येऊन मागितली खंडणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शासकीय कर्तव्य बजावत असणाऱ्या शासकीय सेवकाला त्यांच्या कार्यालयात येऊन खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगर शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभागीय कार्यालयात ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गौतम ब्रह्मराक्षे व दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, अनिल चांगदेव राजभोज (वय 56, रा. कुऱ्हाडे हॉस्पिटल इमारत, प्रोफेसर कॉलनी चौक, नगर) हे त्यांच्या शासकीय कार्यालयात शासकीय कर्तव्य बजावित असताना शनिवारी (दि. 16) दुपारी चार वाजता तीन जण आले. त्यांनी राजभोज यांना संविधान चेतना संमेलन 3 या कार्यक्रमाची पत्रिका दिली. त्यानंतर सायंकाळी कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायची असल्याची बतावणी करून एक हजार रुपये मागितले. सदर पैसे देण्यास राजभोज यांनी विरोध केला. त्यामुळे गौतम ब्रह्मराक्षे याने त्याच्या हातातील मोबाईलमध्ये अनिल राजभोज हे शासकीय कामकाज करीत असताना व्हिडिओ शूटिंग करून शासकीय कामात अडथळा आणला.

या घटनेनंतर राजभोज हे फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याकडे निघाले. त्यावेळी गौतम ब्रह्मराक्षे व त्याच्या साथीदारांनी अडवून राजभोज यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अनिल राजभोज यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध संगनमताने सरकारी कामात अडथळा आणणे, शासकीय सेवकास खंडणी मागणे, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे करीत आहेत.