‘ये चलती क्या…’ म्हटल्याची विचारणा केल्याने दोघांना बेदम चोपले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – वाडिया पार्कसमोरील फिरोदिया हायस्कूलच्या कोपऱ्यावर गप्पा मारत बसलेल्या दोन युवकांसोबत बसलेल्या युवतीला दोन जण ‘ये चलती क्या’ म्हटले. त्याची विचारणा केल्याच्या रागातून दोघांना लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली. तसेच एकाच्या खिशातील रोख रक्कम हिसकावून घेतली. 27 डिसेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडलेल्या घटनेबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. 1) रात्री दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये किशोर शहाजी थोरवे (रा. बुरूडगाव रोड, नगर), अरुण श्रीरामचंद्र पटेल, रवी प्रेमलाल आदिवासी, अनिसकुमार श्रीरामभजन नामदेव, पोलाट बादल व इतर चार ते पाच अनोळखी इसम (सर्व रा. प्रगती हॉटेल, माळीवाडा, नगर) यांचा समावेश आहे. या मारहाणीत स्वप्निल शशिकांत नजान (वय 21, रा. शिवनेरी चौक, स्टेशन रस्ता, नगर) व आकाश सोमदत्त तोडमल हे दोघे जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नजान, तोडमल व एक युवती असे तिघे फिरोदिया स्कूलच्या कोपऱ्यावर असलेल्या स्ट्रीट लाईटजवळ गप्पा मारत बसले होते. थोरवे व पटेल हे दोघे तेथे आले. ‘ये चलती क्या’, असे त्या युवतीला म्हणाले. नजान यांनी जाऊ द्या, असे थोरवे यास सांगितले. त्यामुळे रागावलेल्या थोरवे व पटेल याने त्याच्या इतर सात ते आठ साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी नजान व तोडमल यांना लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच आकाश तोडमल त्यांच्या खिशातील दोन हजार तीनशे रुपयांची रोख रक्कम काढून घेतली व नजान यांची मोबाईल फोडून नुकसान केले.

याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे हे करीत आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.