प्रियंका गांधींना निवासस्थान सोडायला सांगणे हे सरकारचे क्षुद्र राजकारण :

पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींना त्यांचे शासकीय निवासस्थान सोडायला लावणे या आदेशामागे मोदी सरकारचे क्षुद्र राजकारण आहे अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सत्तेचा वापर करुन तुम्हाला आम्ही त्रास देऊ शकतो हे यातून हे दाखवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करते आहे असाही आरोप त्यांनी केला. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी उत्तर दिले आहे.

सत्ता हातात असली की ती विनयाने वापरायची असते. सत्तेचा दर्प एकदा डोक्यात गेला की अशा प्रकारच्या गोष्टी होतात. एकतर पंडित जवाहरलाल नेहरुंचे योगदान स्वातंत्र्य चळवळीत होते. हे देश म्हणतो. लोकशाहीच्या मार्गाने देश त्यांनी घडवला. पंडित नेहरु यांच्या कन्या इंदिरा गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. इंदिरा गांधीचे चिरंजीव राजीव गांधी यांनीही देशासाठी बलिदान दिले. एका कुटुंबात देशासाठी बलिदान देणारे दोन लोक आणि त्या आधीच्या पिढीने सगळे आयुष्य देशासाठी वेचले आहे. अशा कुटुंबातली मुलगी आज सोनिया गांधींसोबत पक्ष चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याशी राजकीय मतभेद असतील तरीही हातात सत्ता आहे म्हणून तुम्हाला आम्ही त्रास देऊ शकतो असे हे धोरण झाले. सत्तेचा वापर तुमच्याविरोधात करु शकतो हे दाखवण्यात काही शहाणपणा नाही. एका माजी पंतप्रधानाच्या मुलीला दिलेले निवासस्थान तुम्ही काढून घेता, त्यानंतर त्यांच्यावर आता लखनऊमध्ये जाऊन राहण्याची वेळ आली आहे हे सगळे क्षुद्र राजकारण आहे. हे सुसंस्कृत राजकारण नाही.