आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन

कोलकाता : वृत्तसंस्था – आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांचे वाय 84 वर्षे आणि 8 महिने होते. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांनी गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये सोमवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती पहिल्यापेक्षा नाजूक झाली होती. यामुळे राज्याचे सीएम आपला दिब्रुगढ दौरा मध्येच सोडून गुवाहाटीला परतले होते. ताज्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल जीएमसीएचला पोहाेचले होते.

आसामच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनावर देशातील अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, तरुण गोगोईजी एक लोकप्रिय नेते आणि एक वयोवृद्ध प्रशासक होते, ज्यांना आसामसह केंद्रातीलसुद्धा अनुभव होता. त्यांच्या निधनाने दु:खी आहे. दु:खाच्या या काळात माझ्या संवेदना त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांसोबत आहेत.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, तरुण गोगोई एक सच्चे काँग्रेस नेते होते. त्यांनी आपले जीवन आसामचे सर्व लोक आणि समाजाला एकत्र आणण्यासाठी समर्पित केले. माझ्यासाठी ते एक महान आणि बुद्धिमान शिक्षक होते. माझे त्यांच्यावर खूप प्रेम होते आणि त्यांचा सन्मान करत होतो. मी त्यांना मिस करेन. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझे प्रेम आणि संवेदना.

यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपला दौरा रद्द केल्याची माहिती ट्विट करून दिली होती. त्यांनी म्हटले होते की, तरुण गोगोई मला पित्यासमान आहेत.

आई – वडिलांपेक्षा वेगळे करिअर निवडले
तरुण गोगोई यांचे वडील डॉ. कमलेश्वर गोगोई रंगजन टी इस्टेटमध्ये एक मेडिकल प्रॅक्टिशनर होते, तर आई उषा गोगोई कवयित्री होत्या. त्या प्रसिद्ध कवी गणेश गोगोई यांच्या छोट्या भगिनी होत्या. तरुण गोगोई यांनी आपल्या आई-वडिलांपेक्षा वेगळे करिअर निवडले. एक वकील म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली. 1963 मध्ये आसाम गुवाहाटी युनिव्हर्सिटीमधून एलएलबी केले. ते सामाजिक कार्य आणि राजकारणात सक्रिय होते.

30 जुलै 1972 ला गोगोई यांनी डॉली गोगोई यांच्याशी विवाह केला. डॉली यांनी जीवशास्त्रात शिक्षण घेतले. त्यांना मुलगा गौरव गोगोई आणि मुलगी चंद्रमा गोगोई अशी दोन मुले आहेत.